जम्मू काश्मीर : घुसखोरीचा प्रयत्न सैन्याने 'असा' हाणून पाडला

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (LoC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला. त्यासोबतच दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. नगरोटा येथील मुख्यालय असलेल्या व्हाइट नाईट कॉर्प्सने गुरुवारी रात्री दहशतवादी हालचालींचा शोध घेतला आणि तत्काळ प्रत्युत्तर देत त्यांच्याशी चकमक घडवून आणली.  

भारतीय लष्कराच्या जवानांनी सतर्कतेने हे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले. व्हाइट नाईट कॉर्प्सने एक्सवर पोस्ट करत सांगितले की, "गेल्या रात्री नियंत्रण रेषेवरील पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी हालचाली दिसून आल्या. सतर्क जवानांनी त्वरित प्रत्युत्तर देत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे. शोधमोहीम अद्याप सुरू आहे."  

गुरुवारी, डोडा जिल्ह्यात संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली. त्याआधीच्या दिवशी, राजौरी जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचे 'ओव्हर ग्राउंड वर्कर्स' शोधण्यासाठी २५ ठिकाणी छापे टाकले होते.  

ओव्हर ग्राउंड वर्कर्स हे दहशतवाद्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ते दहशतवाद्यांना रसद पुरवतात, शस्त्रांची वाहतूक करतात आणि सुरक्षा दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. याशिवाय, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार,ओव्हर ग्राउंड वर्कर्स हे सौम्य आणि असुरक्षित ठिकाणे ओळखून दहशतवाद्यांना मदत करतात.  

सुरक्षा दलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर येथे दोन दहशतवाद्यांनी एका पायाभूत सुविधा कंपनीच्या कामगार छावणीवर हल्ला करून सात जणांची हत्या केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये रविवारी बाजारात ग्रेनेड हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये एक महिला ठार झाली, तर ११ नागरिक जखमी झाले होते.  

या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा दलांनी कठोर उपाययोजना घेतल्या असून, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी नियंत्रण रेषेवर सतर्कता अधिक वाढवण्यात आली आहे.