शिल्पकार जयदीप आपटे अखेर जेरबंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेप्रकरणतील फरार असलेल्या आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आलीय. राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे हा फरार होता. शिल्पकार जयदीप आपटे यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी त्याला अटक केलीय. जयदीप आपटे आपल्या कुटुंबियांनी भेटायला आला असताना पोलिसांनी त्याला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा रात्रीचा फायदा घेत पत्नी आणि आईला भेटायला कल्याण येथील राहत्या घरी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. महाराजांचा हा पुतळा काही दिवसापूर्वी पडला त्यानंतर राज्यातील राजकारण जोरात तापलं होतं. पुतळ्याच्या दुर्घटना होण्यापासून जयदीप आपटे हा फरार होता, त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकऑऊट नोटीस जारी केली होती. काही दिवसापासून पोलीस त्याच्या मागावर होते, आज मात्र पोलिसांच्या प्रयत्नाना यश आले. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गातील मालवण येथे राजकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं लोकार्पण डिसेंबर २०२३ मध्ये झालं होतं. पण अवघ्या आठ महिन्यांनी २६ ऑगस्ट २०२४ ला शिवरायांचा हा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या घटनेमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडलं होतं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती. तसेच पुतळा कोसळल्याच्या घटना प्रकरणाची सविस्तर तपास करणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं.