भारताने लावला ११.७ अरब वर्षांपूर्वीच्या ब्रह्मांडीय तंतूंचा शोध

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नुकताच भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावला आहे. ब्रह्मांडातील अदृश्य तंतूंच्या संरचनेच्या बाबतीत हा शोध आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने ११.७ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या प्रकाशाचा अभ्यास करून ब्रह्मांडातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत सूक्ष्म घटक उघड केला आहे. या तंतूंच्या शोधामुळे ब्रह्मांडातील दीर्घिकांच्या वाढीचा आणि उत्क्रांतीचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे.

या संशोधनाचे नेतृत्व इशिता बॅनर्जी आणि डॉ. सौगत मुजाहिद यांनी केले. त्यांनी चिलीमधील अत्याधुनिक व्हेरी लार्ज टेलिस्कोप (VLT) आणि म्युल्टी-युनिट स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सप्लोरर (MUSE) या उपकरणांचा वापर करून ब्रह्मांडाच्या दूरस्थ भागात निरीक्षण केले. त्यांचा लक्ष केंद्रित केला तो क्वासर Q1317–0507 या तेजस्वी खगोलीय घटकावर. क्वासर अत्यधिक उर्जा उत्सर्जित करणारा असतो, जो ब्रह्मांडातील गूढतेला अधिक स्पष्ट करू शकतो.

संशोधनादरम्यान, शास्त्रज्ञांना ब्रह्मांडातील दीर्घिकांशी संबंधित एक प्राचीन आणि मोठ्या आकाराच्या तंतूचा शोध लागला. या तंतूंची लांबी आपल्या आकाशगंगेच्या आकाराच्या १० पट आहे आणि अँड्रोमेडा आकाशगंगेपासूनच्या अंतराच्या एक तृतीयांश जास्त आहे. या तंतूंचे कार्य दीर्घिकांच्या वाढीला मदत करणे आणि नवीन ताऱ्यांची निर्मिती करणे आहे.

शास्त्रज्ञांनी या तंतूंच्या संरचनेचे सूक्ष्म विश्लेषण केले, ज्यामुळे ब्रह्मांडीय जाळ्याच्या महत्त्वपूर्ण भूमिका आणि दीर्घिकांच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांचा अंदाज घेता आला. या तंतूंच्या माध्यमातून, दीर्घिकांची वाढ होऊ शकते आणि नवीन ताऱ्यांची निर्मिती शक्य होते.

या संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्याचाही महत्त्वाचा वाटा आहे. युरोपीय दक्षिणी वेधशाळा (ESO), मिशिगन विद्यापीठ, मिलान-बीकोका विद्यापीठ आणि लेडेन विद्यापीठ यांसारख्या प्रमुख संस्थांनी संशोधकांना मदत केली. यामुळे, हे संशोधन एक वैश्विक सहकार्याचा परिणाम आहे, ज्यामुळे आधुनिक खगोलशास्त्रातील नवा दृष्टिकोन समोर आला आहे.

डॉ. सौगत मुजाहिद यांचे म्हणणे आहे की, "यामध्ये शोधलेल्या तंतूंचे उत्सर्जन आणि शोषणाच्या अभ्यासामुळे ब्रह्मांडीय जाळ्याच्या तंतूंबद्दल अधिक माहिती मिळवता येईल. हे शोध भविष्यकाळात अधिक गूढ ब्रह्मांडीय संरचनांच्या उकल होण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात."

या संशोधनामुळे खगोलशास्त्रातील एक नवा मार्ग खुला झाला आहे. भविष्यात या तंतूंचा आणखी सखोल अभ्यास करून ब्रह्मांडाच्या प्राचीन इतिहासाचा अधिक स्पष्ट अंदाज घेतला जाऊ शकतो.