ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमैन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.५) त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारताच्या AI स्टॅक - GPU, मॉडेल्स आणि ॲप्स तयार करण्याच्या धोरणावर चर्चा केली. अश्विनी वैष्णव यांनी याविषयी त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती शेअर केली.
त्यात त्यांनी लिहिले आहे की, "ऑल्टमन यांना भारतासोबत तिन्ही बाबतीत सहयोग करण्यास रस आहे - जीपीयू, मॉडेल्स आणि ॲप्स. ओपन एआयचे सीईओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाच्या दृष्टिकोनाचे कौतुक करतात."
भारताने नेतृत्व करावे
यावेळी बोलताना सॅम ऑल्टमैन म्हणाले, "मला वाटते की भारत हा एआय क्रांतीच्या नेतृत्व करणाऱ्या देशांपैकी असावा. भारताने काय केले आहे हे पाहणे खरंच आश्चर्यजनक आहे, भारताने तंत्रज्ञान स्वीकारले आहे आणि त्यावर आधारित अनेक नवीन घटकांची निर्मिती करत आहे."
दरम्यान अश्विनी वैष्णव यांनी चांद्रयान-३ मोहिमेच्या कमी खर्चाच्या आणि पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या यशाची कहाणीही सांगितली. ते म्हणाले की, "आपण असे मॉडेल का तयार करू शकत नाही ज्याची किंमत इतर देशांपेक्षा खूपच कमी असेल. नवोपक्रमामुळे हा खर्च कमी होऊ शकतो."
ओपनएआय ही लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटीची मूळ कंपनी
ओपनएआयने नोव्हेंबर २०२२मध्ये जगासमोर चॅटजीपीटीचे अनावरण केले. या एआय टूलने झपाट्याने लोकप्रियता मिळवली आहे. संगीत आणि कविता लिहिण्यापासून ते निबंध लिहिण्यापर्यंत, चॅटजीपीटी बरेच काही करू शकते. हे एक संभाषणात्मक एआय आहे. एक कृत्रिम बुद्धिमत्ता जी तुम्हाला माणसांप्रमाणे उत्तर देते.