दलित-मुस्लिम-मराठ्यांशिवाय निवडणूक जिंकण अशक्य - मनोज जरांगे

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 24 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जातीय समीकरणे जुळवण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे मराठा आणि ओबीसी फॅक्टर चालणार का याची चर्चा सुरू आहे. यातच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दलित आणि मुस्लिम समजाबद्दल एक महत्वाचं विधान केले आहे. 

गेल्या वर्षभरापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणपूर्वी देखील अनेक उपोषण आणि आंदोलने मराठा समाजाने राज्यभरात केली आहेत. मात्र मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि माध्यमांनी त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवले. तेव्हापासूनच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत चांगलाच गाजला. यानंतर लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर  चालल्याचे बोलले गेले. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातील नवीन उमेवादर काही जागांवर उभे करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्या अनुषंगाने मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेत आहेत. नुकतच त्यांनी आंतरवाली येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, “ दलित-मुस्लिम -मराठा एकत्र आल्याशिवाय राज्यात निवडणूक जिंकू शकत नाही.  मराठा, दलित, मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला फक्त दोन दिवस द्या, समाजहिताचे, समाजकरणाचे समीकरण जुळवणार आहे.” 

मुस्लिम समाज सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे. मराठा समाजाच्या विविध आंदोलनांमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.  मराठा आरक्षण लढ्यात मुस्लीम समाजाकडून मिळणाऱ्या पाठींब्याविषयी मनोज जरांगे यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे.  

मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार  - मनोज जरांगे 
मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी ओबीसी आरक्षण दिले गेले त्यावेळी या आरक्षणात १८० जाती होत्या. त्यामध्ये ८३ व्या क्रमांकावर कुणबी ही जात होती. कुणबी म्हणजे शेती करणारा. ओबीसींच्या यादीत लोकांच्या व्यवसायानुसार त्यांच्या जातीचा समावेश करण्यात आला. जर बागवाणचा समावेश जर शेती करतो म्हणून ओबीसींच्या यादीत केला असेल तर मुस्लीम समाजदेखील शेती करतो, त्यांच्यादेखील सरकारी नोंदी सापडल्या आहेत. 

जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. तसेच सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच मी बघतो, असा इशारादेखील त्यांनी दिला होता.   

मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाकडून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे.   

मौलाना सज्जाद नोमानी आणि मनोज जरांगे यांची भेट  
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मौलाना सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मौलाना सज्जाद नोमानी इस्लामिक विद्वान, लेखक, आणि इस्लामच्या प्रचारकांपैकी एक आहेत. ते आल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी इस्लामिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. याशिवाय त्यांनी भारतात आणि जगभरातील मुस्लीम समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आणि शैक्षणिक समस्यांवर काम केले आहे. नोमानी आणि जरांगे यांच्या भेटीची चर्चा देखील झाली होती. 

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, “गोर-गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे. जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यामुळे मी आज सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यामुळे येणाऱ्या निडणुकीत काहीही होऊ शकते.”
 
पुढे बोलताना जरांगे म्हणतात, “सज्जाद नोमानी हे आजारी असल्याने त्यांना आंतरवालीमध्ये येता आले नाही. माझी भेट घेण्याची धडपड असूनही त्यांना भेटता येत नसल्याने मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्यांची भेट घेतली. माणुसकीच्या नात्याने आम्ही ही भेट घेतली आहे.”
 
याशिवाय एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांचाही समावेश आहे. जलील यांनी दोन वेळा रुग्णालयात जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सामाजिक आणि राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले होते. तसेच इतर मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील जरांगे यांची वारंवार भेट घेतली आहे.  

विधानसभा निवडणूक आणि मुस्लिम इच्छुक उमेदवार 
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मनोज जरांगे यांच्याकडे हजारो कार्यकर्ते येत आहेत. जरांगे देखील त्या सर्वांना भेटून त्यांच्याशी चर्चा करत आहेत किंवा मुलाखती घेत आहेत. राज्यात जवळपास  १२ ते १३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम  मते निर्णायक ठरू शकतात, अशी परिस्थिति आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतेच एका मुस्लिम कार्य  कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. 

मुस्लिम मते मिळवण्याची इतर पक्षांची रणनीती काय ? 
पूर्वीपासूनच कॉँग्रेसची वोटबँक म्हणून मुस्लिमांकडे पहिले जाते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करत मुस्लिम समाज कॉँग्रेसची वोटबँक नाही हे मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिले आहे. मुस्लिम मतांचे राजकारण हा प्रत्येक राजकीय पक्ष करतो. परंतु ज्यावेळी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा, त्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याची वेळ येते त्यावेळी मात्र कोणत्याही पक्षाचा नेता सारसावून पुढे येताना दिसत नाही. विविध प्रकारची आश्वासणे देऊन नेतेमंडळी मुस्लिम मते त्यांच्या पदरात पडून घेतात हे मुस्लिम समाजाला आता कळले आहे. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष मुस्लिमांना लुभवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर मुंब्रा येथून नजीब मुल्ला यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी वर्सोव्यातून हरून खान यांनी उमेदवारी दिली आहे. तर कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील काही मुस्लिम उमेदवार दिले आहे. तर वंचितने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अब्दुल सत्तार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

येणाऱ्या विधानसभेत कोणता पक्ष मुस्लिम मते मिळवण्यात यशस्वी होणार, जरांगे आणि मुस्लिम फॅक्टर पुन्हा चालणार का, राज्यातील जातीय समीकरणे कोणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter