'धर्माच्या नावावर निष्पापांचा बळी घेणे महापाप'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 20 h ago
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

 

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. क्रिकेट विश्वातही हळहळ आणि निषेध व्यक्त होत आहे.

बीसीसीआय आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. बीसीसीआयने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये लिहिलं, "पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत आम्ही आहोत. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांसाठी आम्ही प्रार्थना करतो."

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तो म्हणाला, "पहलगाममधील हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला. धर्माच्या नावाखाली निरपराधांना मारणं हा गुन्हा आहे. याचं समर्थन होऊ शकत नाही. ही कोणती लढाई जिथ माणसाच्या जिवाची किंमत नाही. मी कल्पनाही करू शकत नाही की मृतांच्या कुटुंबांना किती दुख आणि वेदना सहन कराव्या लागत असतील. हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हायला हवी."

सिराज पाठोपाठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही सोशल मीडियावर या घटनेवर दुख: व्यक्त केलं. तो म्हणाला, "पर्यटक शांतता अनुभवायला येतात, दहशत नाही. पहलगामचा हल्ला हृदयद्रावक आहे. ही कृती अमानवीय आहे. पीडित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत."

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही हल्ल्याचा निषेध केला. तो म्हणाला, "पहलगाममधील हल्ल्याची बातमी ऐकून मन सुन्न झालं. पीडित कुटुंबांना या दुखातून सावरण्याचं बळ मिळो, ही प्रार्थना आहे."

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनेही या घटनेवर संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "काश्मीरचं सौंदर्य शांततेसाठी प्रसिद्ध आहे. पण या हल्ल्याने त्या शांततेवर आघात केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. हे कृत्य अमानुष आहे. पीडित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter