तेलंगणा आणि राजधानी हैदराबादमध्ये गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटनांमुळे सांप्रदायिक सलोख्याला धोका निर्माण झाल्याबद्दल राज्यातील उलेमा (धार्मिक नेते), विद्वान आणि कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची खात्री करावी अशी त्यांनी सरकारला विनंती केली आहे.
सिकंदराबादमधील मुथ्यालम्मा मंदिरातील मूर्ती विटंबनेचा निषेध करण्यासाठी आणि मुस्लिम समुदाय या घटनेबाबत उदासीन असल्याच्या अफवांना उत्तर देण्यासाठी इस्लामिक विद्वान आणि विचारवंत अलीकडेच एकत्र आले होते.
“आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की केवळ उलामा (इस्लामिक विद्वान) नव्हे तर स्वतः कुराण मुस्लिमांना इतरांच्या देवतांबद्दल वाईट बोलण्यास मनाई करते. जिथे शाब्दिक गैरवर्तन निषिद्ध आहे, तिथे मूर्तीची विटंबना करणे खूप दूरची गोष्ट आहे.” असे जमीयत उलामा हिंदचे (अर्शद मदनी गट) सरचिटणीस मुफ्ती महमूद झुबेर म्हणाले. समाजकंटक कोणत्याही धर्माचे असोत, अशा घटनांना तोंड देण्यासाठी विधानसभेत कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी मौलाना अहसान अल हमौमी, सय्यद गुलाम अफजल बियाबानी आणि इतर इस्लामिक विद्वानांनीही मूर्ती विटंबनाचा निषेध केला.
तर दुसरीकडे, मुफ्ती सादिक मोहिउद्दीन आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांसारख्या विद्वानांचा समावेश असलेल्या युनायटेड मुस्लिम फोरमने कागजनगरमधील तरुणावर जमावाने केलेला हल्ल्यावर, तसेच जैनूरमधील आणखी एका हेट क्राइमच्या घटनेवर प्रकाश टाकला. जैनूरमधील हिंसाचारातील पीडितांना भरपाई देण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि मूर्ती विटंबनाशी संबंधित घडामोडींवर चिंता व्यक्त केली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने यावेळी निदर्शनास आणून दिले की गेल्या वर्षभरात राज्यात लहान आणि मोठ्या अशा 20 जातीय घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जैनूरमधील गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची टीका करत त्यांनी बाजार पुन्हा सुरू करणे, तर्कशुद्ध आधारावर नुकसान भरपाई देणे आणि द्वेषयुक्त भाषणावर कठोर कारवाई करणे अशा मागण्यांची यादी असलेले निवेदन प्रशासनाला सादर केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter