ISIS च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 5 Months ago
दहशतवादी रिझवान अली
दहशतवादी रिझवान अली

 

स्वातंत्र्यदिनाआधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. आयसीस (ISIS) मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली. रिझवान अली असं या अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे.

स्वातंत्र्यदिनापूर्वीच मोठी कारवाई
राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटना आयसीसच्या मॉड्यूलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता पसार
अटक केलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान दिल्लीच्या दर्यागंज परिसरात राहत होता. आयसीसच्या पुणे मॉड्यूलचा तो म्होरक्या आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून तो निसटला होता. तेथून तो फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएसह बऱ्याच तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेल्या या दहशतवाद्यावर तीन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या आधीच रिझवानला झालेली अटक हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं मोठं यश मानलं जात आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयएसह अनेक तपास यंत्रणा आता त्याची चौकशी करून संभाव्य कटाबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

शस्त्रासह २ मोबाइल जप्त
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी एनआयएकडून दहशतवादी रिझवान अली याच्याबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री साधारण ११ वाजता दिल्लीच्या निकट गंगा बख्श मार्गाजवळून त्याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.