भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहे. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या सुरू केल्या. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग तयार झाला आहे. यामुळे ३५० किलोमीटरचे अंतर केवळ ३० मिनिटांत कापता येऊ शकते. म्हणजेच पुणे ते धुळ्याला जाण्यासाठी हायपरलूपने साधारण ३० मिनिटे वेळ लागेल.
ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'एक्स'वर देऊन एक व्हिडिओही प्रसारित केला आहे, 'रेल्वेने आयआयटी मद्रासच्या सहकायनि हायपरलूप चाचणी मार्ग तयार केला आहे. सरकार-शैक्षणिक सहकार्यामुळे भविष्यात वाहतुकीत नावीन्यता येणार आहे," असे त्यांनी काल केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हायपरलूप प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने आर्थिक निधी पुरविला असून आयआयटी मद्रासच्या परिसरात हा ४२२ मीटरचा चाचणी मार्ग तयार केला आहे.
आयआयटी मद्रासला प्रत्येकी दहा लाख डॉलरचा निधी दोन वेळा देण्यात आला आहे. यामुळे आता वेळ आली आहे, असे वाटते. हायपरलूप प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दहा लाख डॉलरचा तिसरा हप्ता देण्यात येईल, असे वैष्णव यांनी सांगितले. पहिला व्यावसायिक प्रकल्प हाती घेण्याची रेल्वेची योजना आहे.
हायपरलूप प्रकल्पाचे वैशिष्ट्य
'वाहतुकीचा पाचवा मार्ग' असे वर्णन केले जाणारा हायपरलूप ही दीर्घ अंतरावरील प्रवासासाठी वेगवान वाहतूक व्यवस्था आहे. या प्रकारच्या रेल्वे व्यवस्थेत एका निर्वात पाइपमध्ये विशेष डबे असतात. त्यामुळे ती वेगाने धावते. या निर्वात पाइपमधील इलेक्ट्रोमॅग्निटिकली डबे तरंगत्या अवस्थेत पुढे जातात. यामुळे याचा वेग 'मॅच १.०' पर्यंत पोहोचतो.
एक 'मॅच' या वेगाच्या एककानुसार सर्वसामान्य दिवशी समुद्रसपाटीवर एक हजार २२४ किलोमीटर प्रतितास वेग गृहित धरले जाते. हायपरलूप व्यवस्था ही हवामानसक्षम, टक्करमुक्त प्रवासासाठी उपयुक्त असते. विमानाच्या दुप्पट वेगाने ही रेल्वे धावू शकते. यासाठी वीजही कमी लागते आणि २४ तासांसाठी ऊर्जा साठवता येते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. हायपरलूप मार्गाची चाचणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर हे प्रगत तंत्रज्ञान भारतात व्यापक स्वरूपात वापरात येऊ शकते.