भारतीय नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावरून हजारो किलोंचे अमली पदार्थ केले जप्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 10 Months ago
भारतीय नौदलाने जप्त केलेले 3300 किलोचे अंमली पदार्थ
भारतीय नौदलाने जप्त केलेले 3300 किलोचे अंमली पदार्थ

 

भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे 3300 किलो ग्रॅम प्रतिबंधित (3089 किलोग्रॅम चरस, 158 किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि 25 किलो ग्रॅम मॉर्फिन) अमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका ताब्यात घेतली आहे. गुजरातच्या पोरबंदरजवळील जहाजातून हे अमली पदार्थ, पकडण्यात आल्याचे नौदलाने सांगितले.

याबाबत भारतीय नौदलाच्या सागरी टेहळणी विमानांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने या गुप्त माहितीची शहानिशा केली होती. या माहितीच्या आधारावर, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अमली पदार्थांसह भारतीय जल सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयास्पद नौकेला अडवण्यासाठी भारतीय नौदलाने आखलेल्या मोहिमेत एका युद्धनौकेद्वारे कारवाई करण्यात आली.

या नौकेला रोखून अलिकडच्या काळात अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.

ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते.