भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हिंद महासागरात समुद्री चाच्यांना पकडले.
भारताने आफ्रिका खंडातील देशांसोबत संयुक्त नौदल अभ्यास सुरू केला आहे. हिंदी महासागरात चीनचा वाढता व्यापारी आणि लष्करी प्रभाव लक्षात घेता हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. भारताचा हा सराव आफ्रिकेत प्रभाव वाढवण्याच्या आणि या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रात नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. काल तान्झानियाच्या दार-ए-सलाम येथे या सहा दिवसीय सरावाला सुरुवात झाली. भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या सरावाचे उद्घाटन केले. तान्झानियाच्या यजमानपदाखाली हा सराव होत असून, यात केनिया, मादागास्कर, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका यांच्यासह एकूण दहा देश सहभागी आहेत.
‘आयकेम’ (Africa-India Key Maritime Engagement) असे नाव असलेला हा सागरी अभ्यास दोन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये बंदर आणि सागरी असे टप्पे असणार आहेत. बंदर टप्प्यात टेबलटॉप चर्चा, कमांड पोस्ट सराव, चाचेगिरीविरोधी रणनीती आणि माहिती आदान-प्रदान यावर भर देनेत येईल तर सागरी टप्प्यात शोध आणि बचाव मोहिमा, लहान शस्त्रांचा सराव, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि जहाज तपासणी यांचा समावेश आहे.
भारतीय नौदलाने हा सराव अभ्यास दर दोन वर्षांनी आयोजित करण्याची योजना आखली आहे. यामुळे भविष्यात पश्चिम आफ्रिकेतील देशांनाही यात सहभागी करून घेता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताने या सरावासोबतच ‘इंडियन ओशन शिप (IOS) सागर’ ही आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत भारतीय नौदलाचे प्रमुख जहाज INS सुनयना, तसेच INS चेन्नई आणि इतर जहाजे दक्षिण-पश्चिम हिंदी महासागरात तैनात करण्यात आली आहेत. INS सुनयनावर भारतासह नऊ देशांचे 44 नौसैनिक संयुक्तपणे कार्यरत असतील. ही मोहीम १५ एप्रिल पासून ८ मे पर्यंत चालेल आणि यात दार-ए-सलाम, नाकाला (मोझांबिक), पोर्ट लुईस (मॉरिशस), पोर्ट व्हिक्टोरिया (सेशेल्स) आणि माले (मालदीव) येथे बंदर भेटी आणि तान्झानिया, मोझांबिक, मॉरिशस आणि सेशेल्सच्या विशेष आर्थिक क्षेत्रांचे (EEZ) संयुक्त निरीक्षण समाविष्ट आहे.
हा सागरी अभ्यास भारताच्या व्यापक भू-राजकीय रणनीतीचा भाग आहे. यामध्ये हिंदी महासागरात नेतृत्व प्रस्थापित करणे आणि आफ्रिका खंडात आर्थिक आणि संरक्षण सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे. गेल्या दशकात भारताने चाचेगिरीविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च २०२४मध्ये भारतीय नौदलाने अरबी समुद्रात सोमाली चाच्यांनी पळवलेल्या बुल्गारियन मालवाहू जहाज MV रुएनची कमांडो-शैलीतील सुटका करून आपली क्षमता दाखवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मॉरिशस दौऱ्यावर हिंदी महासागरात भारतीय नौदलाला ‘प्राधान्याचे सुरक्षा भागीदार’ आणि ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ म्हणून प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हिंदुस्थानाने या सरावातून केवळ संरक्षण सहकार्यच नव्हे तर आर्थिक आणि राजनैतिक संबंधही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२३-२४ मध्ये भारत आणि आफ्रिकेतील देशांमधील व्यापार ८३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तरीही, हा आकडा चीनच्या २५० अब्ज डॉलर्सच्या व्यापाराच्या तुलनेत कमी आहे.
भारताने गेल्या काही वर्षांत आफ्रिकन युनियनला G20 मध्ये स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. तसेच दोन ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदांचे आयोजन करून विकासशील देशांचे नेतृत्व करण्याची आपली भूमिका अधोरेखित केली आहे.
हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय आहे. चीनने जिबूतीमध्ये आपला पहिला परदेशी लष्करी तळ स्थापन केला असून, तान्झानियातील दार-ए-सलाम आणि मोझांबिकमधील बेइरा यांसारख्या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारतीय विश्लेषक या घडामोडींना चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ रणनीतीचा भाग मानतात. याचा उद्देश भारताला सागरी क्षेत्रात घेरणे आहे. याशिवाय, श्रीलंका, मालदीव आणि बांगलादेशसारख्या भारताच्या शेजारील देशांमध्येही चीनने आपला प्रभाव वाढवला आहे. विशेषतः बांगलादेशातील २०२४ च्या राजकीय उलथापालथीनंतर आणि तिथल्या अंतरिम नेत्याने चीनला भेट दिल्याने भारताची चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताचा हा संयुक्त नौदल अभ्यास सराव केवळ लष्करी सराव नसून, एक राजकीय संदेश आहे. ‘हा सराव भारताच्या हिंदी महासागरातील नेतृत्वाची आणि आफ्रिकेतील वाढत्या प्रभावाची नांदी आहे,’ असे संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त नौदल अधिकारी अभिजित सिंग यांनी सांगितले. मात्र, त्यांनी भारताच्या सध्याच्या सागरी क्षमता आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमधील अंतराकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, “भारताची महत्त्वाकांक्षा मोठी आहे, पण त्यासाठी आवश्यक संसाधने आणि पायाभूत सुविधा यांचा अभाव आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter