जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटननगरीत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने फक्त काश्मीर खोरेचं नाही, तर संपूर्ण देश आणि विशेषतः मुस्लिम समाजही हादरला आहे. मंगळवारी पाच दहशतवाद्यांनी बैसारन खोऱ्यात पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला.या भयानक हल्ल्यात आतापर्यंत २६ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामध्ये परदेशी नागरिक आणि स्थानिक काश्मिरी तरुणाचाही समावेश आहे.
हल्लेखोरांनी काही पर्यटकांची धार्मिक ओळख विचारून त्यांना गोळ्या घातल्या आहेत.हल्लेखोरांनी पर्यटकांची नावे आणि धार्मिक ओळख विचारून त्यांना ठार केले. दहशतवाद्यांचा उद्देश फक्त जीव घेण्यासाठी नव्हता. तर देशभरात सांप्रदायिक द्वेष पसरवण्याचा त्यांचा कट होता.
या घटनेनंतर देशभरतील मुस्लिम नेते, इस्लामिक विद्वान, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य मुस्लिम यांनी एका सुरात दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला आहे. भारतातील मुस्लिम समाज शांतताप्रिय असून एकता आणि मानवतेच्या बाजूने आहे. हिंसा आणि क्रूरतेच्या कोणत्याही प्रकाराला त्यांचा पाठिंबा नाही, याचाच पुरावा त्यांनी आपल्या प्रतिक्रियांमधून दिला आहे.दुसरीकडे, या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या क्रूरतेला धर्माशी जोडणे चुकीचे आहे. हा इस्लामचा अपमान आहे, अशी भावनाही या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
नेमकं कोण काय म्हणाले?
जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सदातुल्ला हुसेनी यांनी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, "हे अमानुष आणि निंदनीय कृत्य आहे. परदेशी पर्यटकांसह निष्पाप लोकांच्या हत्येचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी."
राज्यसभा खासदार आणि कवी इम्रान प्रतापगढी यांनी या घटनेला 'भ्याड हल्ला' म्हटले आहे. X वर त्यांनी लिहिले, "ही घटना मन हेलावणारी आहे. मृतांप्रती संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना. आता सरकारने फक्त दावे करून चालणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. ठोस पावले उचलण्याची आता वेळ आली आहे."
दहशतवाद्यांना कठोर शासन करा - ओवैसी
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "पहलगाममधील अतिरेकी हल्ला निंदनीय आहे. या हल्ल्याच्या दोषींना कायद्याअंतर्गत कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. आम्ही हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबांसोबत उभे आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.", अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
AIMIMचे प्रवक्ते सय्यद असिम वकार यांनीही हल्ल्याविषयी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हे दहशतवादी मुस्लिम असू शकत नाहीत. त्यांनी निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत. त्या तर इब्लिसच्या (सैतानाच्या) औलादी आहेत. त्यांनी जशी क्रूरता दाखवली, त्याच क्रूरतेने त्यांच्याशी वागले पाहिजे. भारत सरकारने त्याच क्रूरपणाने त्यांचा नाश करावा."
मुंबईच्या रझा अकादमी आणि सुन्नी जमीयतुल उलेमा या संघटनांनी संयुक्त निवेदनाद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे, "हा हल्ला केवळ मानवतेविरुद्ध नाही, तर इस्लामच्या मूलभूत शिकवणीविरुद्ध आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. सरकारने अशा राक्षसांचा पूर्णपणे नायनाट करावा."
अजमेर दरगाहच्या प्रमुखांची महत्त्वाची मागणी
प्रसिद्ध अजमेर शरीफ दरगाहच्या आध्यात्मिक वारसदारांपैकी एक सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांनी काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "हा हल्ला माणुसकीवर कलंक आहे. निर्दोष नागरिकांचा जीव घेणे हे इस्लामच्या शांतता, दया आणि जीवनाच्या पावित्र्य या तत्त्वांविरुद्ध आहे. त्यामुळे हा हल्ला इस्लामच्या मूलभूत शिकवणींचाच भंग करणारा आहे. काश्मीरमधील या हल्ल्याने सर्व शांतताप्रिय नागरिकांप्रमाणेच माझे मनही हेलावून गेले आहेत."
चिश्ती यांनी सरकारला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.ते म्हणाले, "दहशतवादाचा समूळ नाश करण्याची वेळ आता आली आहे. 2019च्या पुलवामा हल्ल्यानंतर जशी कारवाई झाली, तशीच कठोर पावले उचलण्याची आता गरज आहे. सरकारने दहशतवादाविरुद्ध ठोस आणि तातडीची पावले उचलावीत. काश्मीरमधील शांतता आणि स्थैर्यासाठी अशी कडक कारवाई आवश्यक आहे."
'सिटिझन्स फॉर फ्रॅटर्निटी'ने केला तीव्र निषेध
'सिटिझन्स फॉर फ्रॅटर्निटी '(CFF) या मुस्लिम विचारवंतांच्या संस्थेने पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरैशी, माजी दिल्ली एलजी डॉ. नजीब जंग, लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शहा, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योजक सईद मुस्तफा शेरवानी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याला 'भ्याड आणि अर्थहीन' म्हटले गेले आहे. "आम्ही भ्याड अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या या क्रूर आणि अर्थहीन हत्याकांडाचा निषेध करतो. या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांचा बळी गेला. आम्ही सर्व संतप्त आहोत.दु:खाने आमचेही हृदय पिळवटून गेले आहे. मात्र आम्ही प्रचंड क्रोधीतही आहोत. या कठीण प्रसंगी आम्ही देशातील नागरिकांसोबत एकजुटीने उभे आहोत. आम्ही आपापसात कोणत्याही प्रकारे विभागणी होऊ देणार नाही."
हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी संस्थेने सरकारकडे केली आहे. या जघन्य अपराधात सामील असणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी संस्थेने केली असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
विस्डम फाउंडेशनची सरकारकडे मागणी
मुंबईच्या विस्डम फाउंडेशनने पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. फाउंडेशनच्या महासंचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या झीनत शौकत अली म्हणाल्या, "हा हल्ला धक्कादायक, क्रूर आणि हिंसक आहे. एका निर्दोषाचा जीव घेणे म्हणजे संपूर्ण मानवजातीला मारण्यासारखे आहे आणि एका निर्दोषाला वाचवणे म्हणजे संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासारखे आहे, अशी कुराणची शिकवण आहे. त्यामुळे अतिरेक्यांनी इस्लामच्या शांततेच्या तत्त्वांनाच हरताळ फसला आहे."
विस्डम फाउंडेशनने हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केलीआहे. झीनत शौकत अली म्हणाल्या, "आम्ही दुखी आणि संतप्त आहोत. या निघृण कृत्यामागील लोकांवर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. काश्मीरमधील शांतता आणि सुरक्षेसाठी सरकारने तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे."
पंजाबच्या शाही इमामांनी केला भ्याड हल्ल्यांचा निषेध
पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांनी काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा हल्ल्या माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "निर्दोष लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. एका निर्दोषाची हत्या म्हणजे संपूर्ण मानवजातीची हत्या, असे कुराणने स्पष्टपणे बजावले आहे. त्यामुळे हे कृत्य खरे तर धर्मविरोधी आहे."
ते म्हणाले, "हे अतिरेकी स्वतःला मुस्लिम म्हणवतात, पण ते इस्लामचे अनुयायी असूच शकत नाहीत. या हल्ल्याची चौकशी करून दोषींना जाहीर फाशी द्यायला हवी. दहशतवादाचा हेतू देशातीलएकता आणि अखंडता नष्ट करणे हा आहे. आपण त्यांना यशस्वी होऊ द्यायचे नाही. आपण एकजुटीने उभे राहायला हवे." शाही इमाम यांनी सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत अनुयायांसह लुधियानामध्ये निषेध मार्चही आयोजित केला होता. सरकारने पीडितांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जमीअत उलमा-ए-हिंद कडून शोक व्यक्त
जमीअत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांनी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुख आणि शोक व्यक्त केला. या हल्ल्याचा त्यांनी कठोर शब्दांत निषेध केला.
मौलाना मदनी म्हणाले, "२६ निष्पाप पर्यटकांची क्रूर हत्या ही अमानवीय कृत्य आहे. याचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडता येणार नाही. जे लोक याला इस्लामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना इस्लामच्या खऱ्या शिकवणींची माहिती नाही. इस्लाममध्ये निष्पाप व्यक्तीची हत्या ही संपूर्ण मानवतेच्या हत्येसारखी मानली जाते."
मौलाना मदनी यांनी सांगितले की, "जमीअत उलमा-ए-हिंद पीडित कुटुंबांच्या दुखात सहभागी आहे. जखमींची लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. या प्रसंगी जमीअत उलमा-ए-हिंदने सर्व नागरिकांना शांतता, बंधुभाव आणि सहिष्णुता कायम ठेवण्याचे आवाहन केले. अशा घटनांचा उद्देश भय, द्वेष आणि सांप्रदायिकता पसरवणे हा असतो. याला रोखण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे."
लखनऊमध्येही उमटले निषेधाचे सूर
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील पीडितांसाठी शोक व्यक्त केला. यावेळी विशेष नमाज अदा करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लखनऊ ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाल यांनी दारुल उलूम फिरंगी महाल आणि शाहीन अकादमीच्या विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या सकाळच्या सभेत पहलगाममधील हत्याकांडाचा निषेध केला. त्यांनी हल्ल्याला अमानवीय कृत्य संबोधले.
मुस्लीम स्टुडंट्स ऑर्गनायझेशनची सरकारकडे मागणी
मुस्लीम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (MSO) ने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे." हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या लवकर बरे होवोत यासाठी आम्ही प्रार्थना करतो.", अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हा हल्ला धार्मिक धृविक्र्ण करणारा आणि देशाच्या शांततेला धोका निर्माण करणारा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. काश्मीरमध्ये कडक सुरक्षा असूनही दहशतवादी हल्लाकरून पळून जाण्यात यशस्वी कसे ठरले याविषयी संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. प्रशासनाच्या अपयशामुळे शांततेला धोका निर्माण करणाऱ्या शक्ती आपल्या नापाक हेतूंमध्ये यशस्वी झाल्यात, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
MSO ने काश्मिरी मुस्लिमांच्या धैर्याचे आणि सौहार्दाच्या भावनांचे कौतुक केले. या घटनेनंतर सामान्य काश्मिरी दहशतवादाविरुद्ध रस्त्यावर उतरले. सर्वसामान् काश्मिरी मुस्लिम शांतता इच्छितो. त्याच्या मनात बंधुभाव आणि सहानुभूती जिवंत आहे, हेच यातून सिद्ध होते . मात्र पाकिस्तान प्रायोजित काही लोकांना हे सहन होत नाही. म्हणून ते अशा नापाक कृत्यांना पाठिंबा देतात.त्यामुळे काश्मीरसह संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या कट्टर वहाबी उलेमांच्या सर्व साहित्य- सामग्रीवर बंदी घालावी, अशी मागणीही संस्थेने सरकारकडे केली आहे.