दिल्लीच्या जामा मस्जिदीबाहेर मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शनं केली.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. प्रत्येकजण दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करतोय. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांत जुम्माच्या नमाजावेळी मुस्लिम समुदायाने हातावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. हा निषेध करताना राज्यातील विविध संघटनांनी विशेषतः मुस्लिमांनी सरकारला दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
शुक्रवार हा मुस्लिम समाजासाठी महत्वाचा दिवस असतो. शुक्रवारच्या (जुम्माच्या) नमाजला मोठी गर्दी होत असते. या नमाजच्या आधी खुतबा (प्रवचन) दिले जाते. यावेळी मुस्लिम नागरिकांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी दुवा करण्यात आली.
असदुद्दीन ओवेसींनी मुस्लिमांना केलं होतं आवाहन
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. याच अनुषंगाने AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी मुस्लिमांना शुक्रवारच्या दिवशी नमाज दरम्यान दंडाला काळ्या फिती बांधावून पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन केले होतं.तसेच मशिदीच्या बाहेर मुस्लीम बांधवांना दंडावर काळ्या बांधण्यासाठी काळ्या फिती दिल्या होत्या. हे आवाहन करताना ते म्हणाले, "आम्ही सर्वजण या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मुस्लिमांनी नमाजवेळी काळ्या फिती बांधून या हल्ल्याचा निषेध करावा. इस्लामच्या आडून खून करण्याच्या कृतीला आम्ही समर्थन देत नाही, असा संदेशही यातून देऊया." दहशतवादाविरोधात एकजुटता दाखविण्यासाठी आणि शांतीचा संदेश देण्यासाठी ओवेसी यांनी हे आवाहन केले आहे.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हैदराबादमध्ये काल मक्का मशिदीत जुम्माच्या नमाजात लोकांनी काळ्या फिती बांधल्या. नमाजनंतर मुस्लिम समुदायाने याठिकाणी 'पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्यांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली.
दिल्लीच्या जामा मस्जिदीतून हल्ल्याचा निषेध
दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मस्जिदीत जुम्माच्या नमाजानंतर मुस्लिम समुदायाने पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित सर्वांनी शांती आणि एकतेचा संदेश देत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
तसेच दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी सांगितलं की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांसाठी जुम्माच्या नमाजात दुआ मागण्यात आली. आम्ही निष्पाप लोकांचा खून थांबवण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली."
जमीयत उलेमा-ए-हिंदचे मौलाना अरशद मदनी आणि मौलाना महमूद मदनी, दारुल उलूम देवबंद, जमाअत-ए-इस्लामी हिंद, मुंबईची रझा अकादमी आणि अजमेर दरगाहशी जोडलेले सलमान चिश्ती व नसीरुद्दीन चिश्ती यांनी एकजुटीने या हल्ल्याचा निषेध केला. या सर्वांनी दहशतवादी कृत्याला क्रूर आणि मानवतेविरोधी सांगत कारवाईची मागणी केली.
वाराणसीत शांतीसाठी दुआ
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या जामा मस्जिदीत जुम्माची नमाज शांततेत पार पडली. यावेळी देशात शांती राहावी आणि पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी दुआ करण्यात आली. नमाजी जीशान अन्सारी म्हणाले, "हल्ल्यातील पीडितांसाठी आम्ही दुआ मागितली. देशात सुख-शांती राहावी, अशी आमची इच्छा आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली अर्पित केली असुनं त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे."
नमाजी मोहम्मद असलम यांनी सांगितलं, "पहलगाममध्ये माणुसकीचा खून झाला. तिथे हिंदू किंवा मुस्लिम मेलं नाही, तर माणुसकी मेली. पर्यटकांच्या मृत्यूचं आम्हाला दुख आहे. नमाज नंतर आम्ही सर्वांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दुआ मागितली."
सैफ कुरैशी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, "पहलगाम मधील हल्ला निंदनीय आहे. दहशतवाद्यांचा धर्म किंवा जाती नसते. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. सरकारनं दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी."
उत्तरप्रदेशमध्येही मुस्लिमांकडून निषेध
उत्तर प्रदेशातल्या संभळच्या शाही जामा मशिदीसह अनेक मशिदींमध्ये जुम्माच्या नमाजमध्ये नागरिकांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधल्या. हातात फलक घेऊन त्यांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणा दिल्या. तर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीदेखील केली.
लखनऊमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा
लखनऊच्या आसिफी मस्जिदीबाहेर मुस्लिम समुदायानं जुम्माच्या नमाजानंतर निदर्शनं केली. यावेळी मुस्लिम समाजाने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. तसेच पाकिस्तानविरुद्ध 'मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या.
टीले वाली मस्जिदीत काळ्या फिती
टीले वाली मस्जिदीचे इमाम फजलुल मन्नान रहमानी म्हणाले, "मी सर्वांना आवाहन केलं होतं की, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून नमाजासाठी या. आम्ही काळ्या फिती बांधून जुम्माची नमाज अदा केली. मी हल्ल्याचा निषेध करतो. भारत सरकार जो निर्णय घेईल, त्याला देशातील मुस्लिम समुदायाचा पूर्ण पाठिंबा आहे. युद्ध झालं, तर आमच्या सैन्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे."
भोपाळामध्येही संताप
मध्य प्रदेशच्या भोपाळात मुस्लिम समुदायानं काळ्या फिती बांधून जुम्माची नमाज अदा केली. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. एका नमाजीनं सांगितलं, "कश्मीरमध्ये झालेली या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पाकिस्तानला कश्मीरचं यश पाहवत नसल्याने तो सतत दहशतवाद्यांना तयार करतो आणि भ्याड हल्ले करवतो."
कर्नाटकमध्येही निदर्शने
कर्नाटकच्या तुमकूरमध्ये मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. जुम्माची नमाज अदा केल्यानंतर ते म्हणाले, "पहलगाममधील दहशतवादी हल्ला देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा डाव होता. हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे."
दहशतवादाचा पुतळा जाळत पंजाबमध्ये निषेध
पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांनी पहलगाम हल्ल्याला मानवतेवर केलेला हल्ला म्हटलं. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लुधियानाच्या जामा मशिदीबाहेर मुस्लिम समाजाने निदर्शनं केली. यावेळी त्यांनी दहशतवादाचा पुतळा जाळला. शिवाय नमाजवेळी हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांसाठी दुआ मागण्यात आली.
श्रीनगरमध्ये हुर्रियतचे अध्यक्ष आणि कश्मीरचे मुख्य मौलवी मीरवाइज उमर फारूक यांच्यासह शेकडो नागरिकांनी पहलगामच्या पीडित कुटुंबांप्रती एकजुटीसाठी एक मिनिटाचं मौन पाळत या हल्ल्याचा निषेध केला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter