भारत आपल्या अंतराळ प्रवासात एक नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीराला पुढील महिन्यात अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) आगामी काळातील महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री, तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही घोषणा केली.
या मोहिमेद्वारे प्रथमच एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणार आहे. याशिवाय, १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत सोयुझ अवकाशयानातून अवकाशात झेप घेतल्यानंतर तब्बल चार दशकांनंतर प्रथमच भारतीय अंतराळवीर अवकाशात प्रवास करणार आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रात सध्या जोरदार हालचाली सुरू असून, पुढील काही महिन्यांत महत्त्वाकांक्षी मोहिमांची मालिका नियोजित आहे. अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी विविध आगामी अंतराळ मोहिमांच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
इस्रोच्या अध्यक्षांनी माहिती दिली की, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मे २०२५ मध्ये अॅक्सिऑम स्पेसच्या Ax-4 मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी सज्ज आहेत. ही मोहीम भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्याच्या विस्तारात एक मैलाचा दगड ठरेल. भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक असलेले शुक्ला यांची इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे. ते भारताच्या पहिल्या स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी, गगनयानसाठी, प्रमुख दावेदारांपैकी एक आहेत. Ax-4 मोहिमेद्वारे त्यांना अवकाश उड्डाण, प्रक्षेपण प्रक्रिया, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव मिळेल, जो भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी अत्यावश्यक आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “भारत आपला पुढील अंतराळ टप्पा गाठण्यास सज्ज आहे. गगनयानसारख्या प्रकल्पांचा वेग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सहकार्य भारताचे जागतिक अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाचे स्वप्न दर्शवते. या प्रयत्नांचे स्वरूप केवळ वैज्ञानिक नसून, ते विकसित आणि स्वावलंबी भारताच्या दृष्टिकोनाशी जोडलेले आहे."
या बैठकीत इस्रोने जानेवारी २०२५ पासूनच्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांना दिली. यात आदित्य L1 सौर मोहिमेच्या डेटाची सार्वजनिक प्रसिद्धी, जोडणी आणि विलग करण्याच्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी, भारतात विकसित सर्वाधिक शक्तीचा द्रव इंजिन, श्रीहरिकोटा येथून १०० वा प्रक्षेपण (GSLV-F15), तसेच कुंभमेळा २०२५ साठी उपग्रह आधारित निरीक्षण आणि विकस इंजिन पुन्हा सुरू करण्याची यशस्वी चाचणी यांचा समावेश आहे. ही चाचणी भविष्यातील प्रक्षेपक मोहिमांसाठी महत्त्वाची आहे.
मे ते जुलै २०२५ दरम्यानच्या प्रमुख मोहिमांमध्ये, इस्रो PSLV-C61 मोहीम प्रक्षेपित करेल. त्यामध्ये अत्याधुनिक EOS-09 उपग्रह असेल. सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाची उच्च-रिझोल्यूशन चित्रे, सर्व हवामानात आणि रात्रंदिवस घेऊ शकेल. याशिवाय, टेस्ट व्हेइकल-D2 (TV-D2) मोहीम गगनयान क्रू एस्केप सिस्टमचे प्रात्यक्षिक करेल आणि क्रू मॉड्यूलच्या समुद्री पुनर्प्राप्ती प्रक्रियेची चाचणी घेईल.
जूनमध्ये NASA-ISRO सहकार्याने विकसित NISAR उपग्रह GSLV-F16 द्वारे प्रक्षेपित होईल. हा उपग्रह पृथ्वीच्या पर्यावरणाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करेल, यात NASA चे L-बँड आणि इस्रोचे S-बँड पेलोड एकत्रित असतील. जुलैमध्ये LVM3-M5 मोहीम न्यूस्पेस इंडिया लिमिटेडच्या व्यावसायिक करारांतर्गत AST स्पेसमोबाइल इंक., USA साठी ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह प्रक्षेपित करेल.
भारताची अंतराळ रणनीती परिपक्व होत असताना, ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची आगामी मोहीम आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणाऱ्या राष्ट्राचे प्रतीक आहे.