उत्तर बंगालच्या दाट जंगलांपासून ते सिक्कीमच्या बर्फाच्छादित खडतर पर्वतांवर १४६ किलोमीटरचा अत्यंत कठीण आणि प्रतिकूल स्थितीतील प्रवास करत भारतीय जवानांनी ‘आर्मेक्स २४’ ही साहसी मोहीम पूर्ण केली आहे.
२४ दिवसांच्या या आव्हानात्मक मोहिमेत जवानांनी आपल्या शारीरिक क्षमता व मानसिक ताकदीचे प्रदर्शन करत ही साहसी पर्वतीय मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. ही मोहीम सैन्याच्या सहनशक्ती, चिकाटी आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘आर्मेक्स-२४ ही केवळ एक साहसी मोहीम नाही, तर ती भारतीय जवानांच्या चिकाटी, शिस्त आणि तत्परतेचे दर्शन घडवते. अशा मोहिमा नेतृत्वकौशल्य वाढवतात, आणि कठीण परिस्थितीत मानसिक ताकदीची जोपासना करतात,’’ असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
मोहिमेची वैशिष्ट्ये
कालावधी : ही मोहीम २२ मार्च ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत पार पडली. वातावरणाशी जुळवून घेण्याचा कालावधी वगळता, सैनिकांनी १८ दिवस खडतर आणि चढ-उतार असलेल्या कठीण मार्गांवरून सातत्याने प्रवास केला.
पथक या मोहिमेसाठी २० लष्करी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. उंचीचे आव्हान ही मोहीम उष्णकटिबंधीय जंगलांपासून ते १४ हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवरील प्रदेशात पार पडली. ऑक्सिजनची कमतरता व आव्हानात्मक वातावरणात जवानांनी क्षमता सिद्ध केली.