कठीण आव्हानांचा सामना करण्यास लष्कर सक्षम - लष्करप्रमुख द्विवेदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
उपेंद्र द्विवेदी
उपेंद्र द्विवेदी

 

भारतीय लष्कर देशापुढील सध्याच्या तसेच भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व सक्षम असल्याचा विश्वास नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज व्यक्त केला. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. रायसीना हिल्समधील साऊथ ब्लॉकमध्ये मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उपेंद्र द्विवेदी म्हणाले, की लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वय सुनिश्चित करणे आपल्यासाठी प्राधान्यक्रमावरील बाब असेल. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी स्वदेशी लष्करी उपकरणांच्या समावेशास प्रोत्साहन दिले जाईल. लष्कराला कार्यवाहीसंदर्भातील अनोख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यासाठी नेहमीच तयार राहावे लागेल. लष्करप्रमुख म्हणून माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. सध्याच्या तसेच भविष्यातील सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज व सक्षम असल्याची ग्वाही देश आणि देशवासीयांना देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले, की भू-राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असून तंत्रज्ञानातही गतीने बदल होत आहेत. त्यामुळे, जवानांना सातत्याने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आपण युद्धाची रणनीतीही सातत्याने बदलत राहायला हवी. भारतीय लष्कर परिवर्तनाच्या मार्गावर असून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आकांक्षा आहे. त्यासाठी, स्वदेशी घटकांना प्रोत्साहन दिले जात असून देशातच निर्मिती झालेली जास्तीत जास्त युद्ध यंत्रणा आणि उपकरणांचा समावेश केला जाईल.
संघर्षाच्या सर्व पैलूंमध्ये काम करण्यास लष्कर सज्ज असेल, याची खात्री करण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाईल. त्यासाठी, नौदल, हवाई दल आणि इतर घटकांशी संपूर्ण समन्वय राखला जाईल. त्यातून देशाच्या हितसंबंधांचे रक्षण केले जाईल आणि ‘विकसित भारत २०४७’ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी लष्कर राष्ट्र उभारणीचा प्रमुख आधारस्तंभ बनेल, असेही ते म्हणाले.

देशाच्या लष्कराचे नेतृत्व करणे ही आपल्यासाठी अभिमानास्पद व सन्मानाची बाब आहे. भारतीय लष्कराची गौरवशाली परंपरा आपल्या जवानांचे शौर्य व बलिदानावर आधारित आहे. कर्तव्य बजावताना प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. संरक्षण दलांतील सर्वांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत करण्यास आपण बांधील आहोत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter