लवकरच भारत होणार तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 d ago
एका माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
एका माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

एका माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला होता. याठिकाणी त्यांनी २०२५ च्या पहिल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. काही वर्षांतच आपण जगातील ११ व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. त्यांनी देशाच्या वेगवान आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकला.

२०२५ पर्यंत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. एकूण जीडीपीच्या बाबतीत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश भारताच्या पुढे आहेत.  त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना देशाच्या भविष्याचा पाया मानलं.

ते म्हणाले, “सरकारच्या पहिल्या १०० दिवसांतील निर्णयांचं केंद्र तरुणांच्या आकांक्षा राहिल्या आहेत. आम्ही १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी केली. याचा फायदा तरुण व्यावसायिकांना होईल. भारत उपग्रह जोडणी आणि विलग करण्याची परवानगी देणारा चौथा देश बनला आहे. आम्ही अंतराळ क्षेत्राप्रमाणे अणुऊर्जा क्षेत्रही खुलं करत आहोत. आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि गिग अर्थव्यवस्थेला सामाजिक सुरक्षेचं कवच देण्याचा निर्णयही आम्ही जाहीर केला आहे. समावेशकता ही केवळ आश्वासन नसून हेच आमचे धोरण आहे.” 

प्रकल्पांना उशीर होणं हे देशाच्या प्रगतीला रोखतं तर जलद कृती आणि कामगिरी विकासाला चालना देतं असं मत त्यांनी मांडलं. ते म्हणाले, “विलंब हा विकासाचा शत्रू आहे आणि आमचं सरकार हा शत्रू पराभूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.” त्यांनी आसाममधील बोगीबील पुलाचं उदाहरण दिलं. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी १९९७ मध्ये या पुलाचा पाया घातला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला सुरुवात केली. पण नंतरच्या सरकारांमध्ये हे काम रखडलं. यामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला. २०१४ मध्ये केंद्र सरकारने हे काम पुन्हा सुरू केलं आणि २०१८ मध्ये चार वर्षांत पूर्ण केलं, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी केरळमधील कोल्लम बायपास रस्त्याचाही उल्लेख केला. १९७२ पासून प्रलंबित असलेलं हे काम मागील सरकारांनी ५० वर्षं लांबवलं पण केंद्र सरकारने पाच वर्षांत पूर्ण केलं, असं त्यांनी नमूद केलं.

आगामी वेव्ह समिटबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, "आपल्याकडे चित्रपट, पॉडकास्ट आणि गेमिंग उद्योग खूपच जोमात आहे. ‘क्रिएट इन इंडिया’ या संकल्पनेसह आम्ही वेव्ह व्यासपीठाद्वारे या क्षेत्राला पुढील टप्प्यावर नेणार आहोत."

पंतप्रधानांचं हे विधान भारताच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेचं द्योतक आहे. पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सरकारचं तरुणांवर लक्ष केंद्रित करणं स्वागतार्ह आहे. करमाफी, अणुऊर्जा क्षेत्र उघडणं आणि गिग कामगारांना सुरक्षा ही पावलं भविष्यवादी दृष्टिकोन दाखवतात.  वेव्ह समिटसारख्या उपक्रमांमुळे सर्जनशील उद्योगांना चालना मिळेल, पण त्यासाठी पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीचं नियोजनही तितकंच महत्त्वाचं ठरेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter