भारत-अमेरिका व्यापार चर्चांना वेग - एस. जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एशिया सोसायटीच्या अध्यक्षा आणि सीईओ क्युंग-व्हा कांग यांच्यासोबत संवाद साधताना.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एशिया सोसायटीच्या अध्यक्षा आणि सीईओ क्युंग-व्हा कांग यांच्यासोबत संवाद साधताना.

 

नवी दिल्ली येथे आशिया सोसायटीच्या एका कार्यक्रमादरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एशिया सोसायटीच्या अध्यक्षा आणि सीईओ क्युंग-व्हा कांग यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार महत्वपूर्ण चर्चांना वेग आला असल्याचे म्हटलं. 

याविषयी जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली. त्यांनी लिहले, “आज दिल्लीत डॉ. क्युंग-व्हा कांग यांच्याशी संवाद साधताना आनंद झाला. सध्या सुरू असलेल्या आदर्श बदल, नवीन अमेरिकन प्रशासन, बहुध्रुवीय आशिया, व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवस्थेकडे भारतीय दृष्टिकोन यावर चर्चा केली.” 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर शुल्क धोरणामुळे अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. हे नवे शुल्क २ एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी २०२५ च्या शेवटपर्यंत द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, “व्यापार चर्चेसाठी मोदी आणि ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा हा महत्वाचा आहे. मला खात्री आहे की दोन्ही देश सर्वोत्तम करार ठरवतील. मात्र मी या चर्चेच्या निकालाचा आत्ताच अंदाज बांधणार नाही.” 

भारतातील कृषी बाजारपेठेतील बदलांवर प्रश्न उपस्थित केला असता, जयशंकर म्हणाले, "व्यापारातील समस्या म्हणजे संधीही असते. अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यासाठी ठोस आर्थिक कारणे आहेत.. भारत युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम सोबतही स्वतंत्र व्यापार करार करण्याच्या प्रयत्नात आहे.  ही करार प्रक्रिया सुरू असून मोठ्या प्रमाणात व्यापारवृद्धी शक्य होईल.” 

संरक्षण संबंधांबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, "नव्या प्रशासनामुळे संरक्षण क्षेत्रात अधिक सखोल आणि उच्च दर्जाची भागीदारी निर्माण होईल. तसेच अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भारताला अधिक फायदा मिळेल.” 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाअंतर्गत व्यापार भागीदार देशांवर परस्पर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक व्यापार युद्धाचे संकट निर्माण झाले आहे. भारताने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यात बोर्बन व्हिस्की, वाईन आणि इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठी व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच हे २५ मार्चपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यामध्ये भारताला नवीन शुल्कांसाठी काही सवलत मिळू शकते का मात्र स्पष्ट झालेले नाही. 

अमेरिका भारताकडून तेल, वायू आणि संरक्षण सामग्री खरेदी वाढवण्याची अपेक्षा ठेवत आहे. २०२३ मध्ये दोन्ही देशांमधील एकूण व्यापार $१९० अब्ज डॉलर्सवर पोहोचला. २०२३-२४ मध्ये अमेरिका भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार ठरला. यामध्ये ४.९९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter