९० दिवसांत निश्चित होणार भारत-अमेरिकेतील व्यापार करार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

 

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी परस्पर फायदेशीर व्यापार करार येत्या ९० दिवसांत अंतिम होऊ शकतो. अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. दोन्ही देशांनी या करारासाठी चर्चेची रूपरेषा निश्चित केली असून, लवकरच औपचारिक वाटाघाटी सुरू होणार आहेत.

९० दिवसांत कराराची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याने सांगितले की, “या करारात सहज शक्य होणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची मोठी संधी आहे. दोन्ही बाजूंना यात फायदा झाला, तर ९० दिवसांत कर रचना आकार आणि स्वरूप निश्चित होऊ शकते.”  भारत आणि अमेरिका सध्या या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १९१ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

भारताने या करारासाठी काम सुरू केले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत या वाटाघाटींमध्ये बराच पुढे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सातत्याने संवाद सुरू आहे. येत्या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक बैठका होतील. तसेच काही भेटी प्रत्यक्षही होऊ शकतात.

अमेरिकेचे शुल्क आणि स्थगिती
२  एप्रिल २०२५ ला अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. मात्र ९ एप्रिल ला ट्रम्प प्रशासनाने हे शुल्क भारतासाठी ९० दिवसांसाठी, म्हणजेच ९ जुलै 2025 पर्यंत स्थगित केले. तरीही, सर्व देशांसाठी लागू असलेले १० टक्के मूलभूत शुल्क कायम राहील.

याच दरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात सतत संवाद सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच ‘भारत प्रथम’ या भावनेने आणि विकसित भारत २०४७ च्या दृष्टिकोनातून वाटाघाटी करतो. देशहित आणि जनहित सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कधीही घाई करणार नाही. आम्ही बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करत नाही. वेळेची मर्यादा चांगली आहे, कारण ती चर्चेला गती देते. पण जोपर्यंत देश आणि जनतेच्या हिताची खात्री होत नाही, तोपर्यंत घाई करणे योग्य नाही.” 

२०२१-२२  ते २०२३-२४ या काळात अमेरिका भारताची सर्वात मोठी व्यापारी भागीदार होती. भारताच्या एकूण निर्यातीपैकी १८ टक्के निर्यात अमेरिकेत होते, तर आयातीचा वाटा ६.२२  टक्के आणि द्विपक्षीय व्यापारात १०.३३  टक्के हिस्सा आहे. २०२३-२४ मध्ये भारताने अमेरिकेसोबत वस्तूंच्या व्यापारात ३५.३२  अब्ज डॉलरचा व्यापारी ताळेबंद (ट्रेड सरप्लस) नोंदवला. हा आकडा २०२२-२३  मध्ये २७.७ अब्ज, २०२१-२२ मध्ये ३२.८५ अब्ज, २०२०-२१ मध्ये २२.७३ अब्ज आणि २०१९-२०  मध्ये १७.२६ अब्ज डॉलर होता.

२०२४ मध्ये भारताच्या अमेरिकेतील प्रमुख निर्यातींमध्ये औषधे आणि जैविक उत्पादने (8.1 अब्ज डॉलर), दूरसंचार उपकरणे (6.5 अब्ज डॉलर), मौल्यवान आणि अर्धमौल्यवान दगड (5.3 अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (4.1 अब्ज डॉलर), सोने आणि इतर मौल्यवान धातूंचे दागिने (3.2 अब्ज डॉलर), कापडी तयार कपडे आणि अॅक्सेसरीज (2.8 अब्ज डॉलर) आणि लोखंड-स्टील उत्पादने (2.7 अब्ज डॉलर) यांचा समावेश होता. तर आयातीत कच्चे तेल (4.5 अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (3.6 अब्ज डॉलर), कोळसा आणि कोक (3.4 अब्ज डॉलर), हिरे (2.6 अब्ज डॉलर), इलेक्ट्रिक मशिनरी (1.4 अब्ज डॉलर), विमाने आणि अवकाश यानांचे सुटे भाग (1.3 अब्ज डॉलर) आणि सोने (1.3 अब्ज डॉलर) यांचा समावेश होता.

भारत-अमेरिका व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. ९० दिवसांच्या कालमर्यादेत करार पूर्ण करणे आव्हानात्मक असले, तरी परस्पर सहकार्याने हे शक्य आहे. मात्र, भारताने आपल्या हितांचा विचार कटाक्षाने करणे गरजेचे आहे. अमेरिकेचे शुल्क धोरण आणि व्यापारातील अडथळे यामुळे भारतीय निर्यातदारांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा करार करताना भारताने शेती, औषधे आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये बाजारपेठ प्रवेश आणि संरक्षण यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter