दहशतवादाच्या उगमस्थानाची सर्व जगाला कल्पना

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बलुचिस्तानमध्ये झालेल्या जफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणाच्या घटनेनंतर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. या अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, "पाकिस्तानने केलेले हे निराधार आरोप आम्ही पूर्णपणे नाकारतो. संपूर्ण जगाला माहीत आहे की जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे."

नेमकं काय घडलं? 
११ मार्चला दुपारी बोलन परिसरात फुटीरतावाद्यांनी रेल्वे रुळावर बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे जाफर एक्सप्रेस रुळावरून घसरून त्यावर फुटीरतावाद्यांनी ताबा मिळवला. या ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते, ज्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते काही सुरक्षा कर्मचारी आणि गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारीही सामील होते. 

या घटनेत ३३ फुटीरतावादी ठार झाले असून, ४४० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात पाकिस्तान आर्मीला यश मिळाले आहे. या ऑपरेशनची संपूर्ण कहाणी आता समोर आली असून, पाकिस्तान आर्मीच्या मीडिया विंगने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा भारतावर आरोप
या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या हल्ल्यामागे अफगाणिस्तानातून काम करणारे दहशतवादी होते आणि त्यांना भारताकडून पाठिंबा मिळत होता,असा दावा केला  त्यांनी आहे. ते म्हणाले की, "हल्लेखोर सतत अफगाणिस्तानातील आपल्या हँडलर्सशी संपर्कात होते आणि यामागे भारताचा हात असल्याचा संशय आहे. आमच्याकडे पुरावे आहेत की हे हल्ले अफगाणिस्तानातून नियंत्रित केले गेले आणि भारताने त्यांना प्रायोजित केले." 

पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा भारतावर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. या वेळीही त्यांनी तीच पुनरावृत्ती केली, परंतु याबाबत ठोस पुरावे सादर केले नाहीत. पाकिस्तानने अफगाणिस्तान सरकारला देखील आवाहन केले आहे. 

भारताची प्रतिक्रिया
भारताने पाकिस्तानच्या या आरोपांना तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रणधीर जयस्वाल म्हणाले, "पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांना सामोरे जावे आणि इतरांवर दोषारोप करणे थांबवावे. दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कोणता देश आहे, हे सर्वांना माहिती आहे." 

ते पुढे म्हणाले की, "भारत नेहमीच दहशतवादाविरोधात लढत आला आहे आणि शांततेचा पुरस्कार करतो, तर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्यात व्यस्त आहे."

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
चीननेही या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि पाकिस्तानसोबत दहशतवादविरोधी कारवाईसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. बलुचिस्तानमध्ये चालणाऱ्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्पांवर बीएलएने यापूर्वीही हल्ले केले आहेत, ज्यामुळे चिनी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.