कॅनडाच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 8 Months ago
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

 

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले लोक भारतीय वंशाचे असल्याचे कॅनडाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. यानंतर भारत आणि कॅनडामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या प्रकरणी भारताने राजनैतिक माध्यमांद्वारे कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून कॅनडात जे काही घडत आहे ते मुख्यतः त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे आहे आणि त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.

कॅनडाने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. काही प्रकरणांमध्ये ते आमच्यासोबत कोणतेही पुरावे शेअर करत नाहीत, पोलिस यंत्रणाही आम्हाला सहकार्य करत नाहीत. कॅनडात भारताला दोष देणे ही त्यांची राजकीय मजबुरी आहे. कॅनडात निवडणुका जवळ आल्याने ते व्होट बँकेच्या राजकारणात अडकले आहेत. अनेक देशांचे प्रमुख भारतीय पंतप्रधानांचा खूप आदर करतात, असे एस जयशंकर यांनी स्पष्ट केले.

कॅनेडियन पोलिस आम्हाला अटक करण्यात आलेल्या लोकांबद्दल अधिक माहिती देतील याची आम्ही वाट पाहू. साधारणपणे, तुमचा कोणताही राजकीय अजेंडा नसेल तर तुम्ही पुरावे सादर करता. हवेत विधाने करू नका, असे देखील जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर परिस्थिती बदलली आहे. उरी, बालाकोट सर्वांनी पाहिलं. त्यामुळे आम्ही आज स्पष्ट करतो की सीमेपलीकडून पाकिस्तानकडून येणाऱ्या दहशतवादाला भारताकडून योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.

हरदीप सिंग निज्जरला २०२० मध्ये भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादी घोषित केले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती.

भारतीय दूतावासाचे निवेदन

कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांबाबत भारताला संबंधित कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून नियमित अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे.