सामर्थ्यशाली दक्षिणी जगासाठी भारताचे प्रयत्न

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
जॉर्जटाउन डॉमिनिका देशाच्या अध्यक्षा सिल्व्हेनी बर्टन यांच्याकडून गुरुवारी 'डॉमिनिका अॅवॉर्ड ऑफ ऑनर' सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
जॉर्जटाउन डॉमिनिका देशाच्या अध्यक्षा सिल्व्हेनी बर्टन यांच्याकडून गुरुवारी 'डॉमिनिका अॅवॉर्ड ऑफ ऑनर' सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

 

विदेश दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात गयाना येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅरेबियन प्रदेशातील विविध देशांच्या प्रमुखांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या देशांचे भारताबरोबरील संबंध अधिक दृढ कसे होतील, या मुद्द्यावर चर्चेत भर देण्यात आला. दक्षिण जगातील देशांच्या गटाला अधिक बळ निर्माण करून देण्याचा मोदींचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

गयानाची राजधानी जॉर्जटाउन येथे दुसरी भारत-कॅरिकॉम (कॅरेबियन कम्युनिटी) परिषद सुरू असून त्यासाठी गयानाचे अध्यक्ष महंमद इरफान अली यांच्यासह सुरीनामचे अध्यक्ष चान सांतोखी, सेंट लुसियाचे पंतप्रधान फिलिप जे. पिअरे, अँटिग्वा अँड बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी, ग्रेनाडाचे पंतप्रधान डिकन मिशेल, बहामाचे पंतप्रधान ब्रेव्ह डेव्हीस,बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मॉटले आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. केथ रॉली हे आले आहेत. मोदी यांनी या सर्वांशी स्वतंत्रपणे भेट घेत द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सौर आघाडीला कॅरेबियन देशांनी पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी या सर्व देशांचे आभार मानले. 

गयानाचे अध्यक्ष अली यांच्याबरोबर मोदींनी कौशल्य विकास, क्षमता विकास, कृषी, औषधनिर्माण, शिक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासंदर्भात चर्चा केली. याशिवाय, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, सागरी व्यापार या क्षेत्रांमध्ये गयाना हा भारताचा विश्वासार्ह भागीदार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'च्या माध्यमातून सांगितले. सुरीनामचे अध्यक्ष चान सांतोखी यांच्याबरोबर चर्चा करताना नरेंद्र मोदी यांनी टेलिमेडिसीन, व्यापार आणि इतर क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाबरोबर विज्ञान, आरोग्य, शाश्वत ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा करतानाच या देशामध्ये फळे आणि भाजी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी या वेळी सामंजस्य करारही करण्यात आला.

डॉमिनिकाकडून सर्वोच्च पुरस्कार
■ कोरोना साथीच्या कालावधीत कॅरेबियन देशांना केलेल्या मदतीबद्दल आणि द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल डॉमिनिका देशाने पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागर सन्मान बहाल केला. या देशाच्या अध्यक्षा सिल्व्हेनी बर्टन यांनी 'डॉमिनिका अॅवॉर्ड ऑफ ऑनर' मोदींना प्रदान केला. मोदींनी हा सन्मान १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. कोरोना कालावधीत जगभरात लशींची कमतरता असताना भारताने डॉमिनिकाला लशीच्या ७० हजार मात्रा पाठविल्या होत्या. मोदी यांना बुधवारी गवानानेही 'ऑर्डर ऑफ द एक्सलन्स' हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविले आहे.