‘‘भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांना बसलेली खीळ ही तात्पुरती आहे. भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांवर भर देणाऱ्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली असली तरी तेथे कोणतेही सरकार आले तरी बांगलादेशावर असलेला भारताचा प्रभाव कायम राहील आणि भारत-बांगलादेश यांच्यातील संबंध दृढ राहतील,’’असा विश्वास भाजपचे नेते आणि इंडिया फाउंडेशनचे संस्थापक शौर्य दोवाल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.
शौर्य दोवाल म्हणाले, ‘‘भारताने कायमच हे स्पष्ट केले आहे की, आम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास आणि मदतीसाठी कायम तत्पर असलेले राष्ट्र आहोत. मात्र, बांगलादेशाच्या भूमीचा वापर भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर भारत ते सहन करणार नाही.’’ भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हे किती आवश्यक आहे, हे बांगलादेशातील नेत्यांना माहीत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
बांगलादेशातील वातावरण शांत झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील व्यापार पूर्ववत होईल आणि बांगलादेशाशी असलेले संबंधदेखील पूर्ववत होतील असे दोवाल म्हणाले.