विश्वविजेतेपदाच्या लढतीतील चौदावा डाव जिंकून डोमाराजू गुकेशने आपले नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरण्याचा पराक्रम केला आहे. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी अठरावा विश्वविजेता होण्याचा मान गुकेशने मिळविला आहे. विशी आनंदच्या नंतर गुकेश हा केवळ दुसरा भारतीय जगज्जेता ठरला आहे. चीनच्या डिंग लिरेन याचा त्याने पराभव केला. गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वांत तरुण विश्वविजेता ठरला आहे.भारताचे माजी बुद्धिबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंद म्हणाले , "डी. गुकेश अभिनंदन !बुद्धिबळासाठी, देशासाठी आणि वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. डिंग लिरेनकडूनही छान कामगिरी झाली. तो गतविजेता आहे, हे त्याने खेळामधून दाखवून दिले."
विश्व अजिंक्यपदाची ही बुद्धिबळ स्पर्धा सिंगापूर येथे झाली. गुकेशला २.५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. चौदाव्या डावात काय होणार, याची उत्सुकता सर्व बुद्धिबळप्रेमींना लागली होती. क्लासिकल पद्धतीच्या शेवटच्या चौदाव्या डावाची सुरुवात डिंगने रेटी पद्धतीने केली. गुकेशने त्याला योग्य प्रत्युत्तर दिले आणि आपला उंट पटाच्या मध्यभागी नेऊन ठेवला. डिंगने घोड्याच्या साहाय्याने उंटावर हल्ला चढविला. प्यादे पुढे सरकवून गुकेशला पटावर समसमान स्थिती आणता येत होती, परंतु त्याने उंट मागे आणण्याची छोटीशी चूक केली या चुकीचा फायदा डिंगला करून घेता आला नाही. गुकेशने वजिराच्या बाजूचे प्यादे पुढे टाकून डिंगच्या प्याद्यांना आव्हान दिले. डिंगने मोहऱ्यांची अदलाबदल करून पटावर समसमान स्थिती आणली. गुकेशने वजिराच्या बाजूला मुसंडी मारत डिंगचे एक प्यादे खाल्ले. डिंगने वजिरावजिरी करत डाव बरोबरीत नेण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांकडे एक एक हत्ती आणि उंट राहिले. गुकेशकडे एक प्यादे जास्तीचे होते.
जगातील तिसऱ्या मानांकित अमेरिकन हिकारु नाकामुराच्या म्हणण्यानुसार डिंगला बरोबरी करणे, ही अगदी सहज सोपी गोष्ट नव्हती. नाकामुराची शंका रास्त ठरली, जेव्हा डिंगने हत्तीवर हत्ती टाकण्याची घोडचूक केली. गुकेशचा क्षणभर या चुकीवर विश्वासच बसला नाही. त्याने अचूक खेळ करत हत्ती आणि उंट यांची अदलाबदल केली आणि पटावर विजयाची स्थिती आणली. रडकुंडीला आलेल्या डिंगने लगेचच शरणागती पत्करली. गुकेशला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. त्याने नेहमीप्रमाणे पटावरील मोहऱ्या जागेवर लावून नमस्कार करत देवाचे आभार मानले. प्रेक्षकांनी एकच जल्लोष करून नवीन विश्वविजेत्याचे अभिनंदन केले. नेहमीचे प्रशिक्षक गाजेवस्की यांच्या व्यतिरिक्त पेंटाला हरिकृष्ण, राडोस्लाव वोजतासेक, व्हिन्सेंट कीमर, जान ख्रिस्तोफ डूडा या सर्व आघाडीच्या खेळाडूंचा समावेश गुकेशच्या चमूत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गुकेशने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे अभिनंदन. अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम व दृढ निश्चयामुळे त्याला संस्मरणीय प्रदर्शन करता आले. या देदीप्यमान कामगिरीमुळे त्याचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात कोरले गेले आहे. लाखो युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा त्याने दिली आहे."
डी. गुकेश म्हणाला,"आई-वडिलांमुळेच मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो. त्या सर्वांचे आभार. मानसशास्त्रज्ञ अप्टॉन यांच्याबरोबर मी मे महिन्यापासून काम केले आणि त्याचा मला खूप फायदा झाला. विशी आनंद हे तर माझे खूपच मोठे प्रेरणास्थान आहेत."
दोन डावांमध्ये उल्लेखनीय खेळ
डी. गुकेश याने अकराव्या व चौदाव्या अशा दोन फेऱ्यांमध्ये डिंग लिरेनचा पराभव केला. अकराव्या फेरीत डिंगकडून चूक घडली. त्यानंतर गुकेशने हा विजय साकारला. तसेच, चौदाव्या फेरीत ड्रॉ कडे कूच करीत असलेली लढत गुकेशने जिंकली. या फेरीमध्येही डिंगकडून मोठी चूक घडली. रुक व विशप यांच्यापैकी एकही मोहरा बदली केला गेला नसता तर ही फेरी ड्रॉ राहू शकली असती; पण डिंगने स्वतःहून ती चाल केली. यानंतर सामना गुकेश जिंकणार हे निश्चित झाले.
पॅडी अप्टॉन यांचाही वाटा
विश्वविजेतेपदाच्या या प्रवासात मुकेशने आई-वडिलांसह ॐ विश्वनाथन आनंद आणि त्याच्यासोबत असलेल्या टीमला श्रेय दिले. यांत त्याने पंडी अप्टॉन यांच्या नावाचा उल्लेख केला. पॅडी अप्टान हे नाव भारतीयांना नवे नाही. भारतीय क्रिकेटशी ते ते जवळचे राहिले आहेत. अप्टॉन हे २ सूळचे दक्षिण आफ्रिकन आहेत. ते आफ्रिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते; पण मानसिक प्रशिक्षक म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये मिळवलेल्या विश्वविजेत्या संघाचेही ते मानसिक प्रशिक्षक होते.
अप्टॉन आणि भारतीयांचे यश
२०११ : भारतीय एकदिवसीय विश्वविजेता संघ
२०२४: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक विजेत्या हॉकी संघासोबत
२०२४ : बुद्धिबळ विश्वविजेत्या गुकेशसोबत