दक्षिण आशियामधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या देशांतर्गत ढोबळ उत्पन्नात २०२५ मध्ये ६.६ टक्क्यांनी वाढ होईल. खासगी उपभोग, गुंतवणूक, तसेच औद्योगिक उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील विस्तार यामुळे ही वृद्धी शक्य असल्याचे भाकीत संयुक्त राष्ट्रांच्या 'वैश्विक आर्थिक स्थिती आणि शक्यता २०२५' या अहवालात वर्तविण्यात आले आहे. सरकारी कर्जामध्ये झालेल्या वाढीचे भारतासमोर मोठे आव्हान असून देशाच्या वित्तीय शिस्तीवर त्याचा परिणाम होण्याची चिंताही या अहवालात व्यक्त केली आहे.
या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ६.६ टक्के दराने वाढणार असली तरी इतर देशांकडून होणाऱ्या मागणीत घट, कर्जाचे आव्हान व सामाजिक अस्थिरता या बाबी विकासावर परिणाम करू शकतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय तणाव, युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थिती यामुळे इंधन आयातीवर होणारा परिणाम याचाही फटका बसू शकतो. भारतात महागाई घटली असून २०२४ मध्ये कमी झालेला चलनवाढीचा दर २०२५ मध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. २०२४ मधील अनुकूल मॉन्सूनमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे कृषीक्षेत्रातील गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
बांगलादेशमुळे मर्यादा
दक्षिण आशियाचा एकत्रित विकासदर २०२५ मध्ये ५.७ टक्के तर २०२६ मध्ये सहा टक्के राहण्याची शक्यता आहे. हा दर गाठणे भारताच्या आर्थिक कामगिरीमुळे शक्य होणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. दक्षिण आशियामध्ये राजकीय आणि सामाजिक तणावांमुळे प्रगतीसाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये कर्ज आणि महागाईच्या आव्हानांमुळे वाढीचे प्रमाण मर्यादित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, हवामान बदलाचे गंभीर परिणाम या प्रदेशातील शेती आणि अन्न सुरक्षेवर होऊ शकतात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
विकास कायम ठेवण्याची क्षमता
जागतिक व्यापारामध्ये २०२५ मध्ये ३०२ टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून, त्यासाठी भारताने निर्यातक्षम उत्पादनांवर भर दिला आहे. स्थानिक उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. जागतिक स्तरावर अस्थिरता, भू-राजकीय तणाव व हवामान बदल यामुळे काही जोखमी असल्या तरी आर्थिक विकास कायम ठेवण्याची भारताकडे क्षमता आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter