'इतके' टक्के राहणार भारताचा विकासदर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासदराच्या अंदाजात सुधारणा केली असून, आधीच्या ६.६ टक्क्यांवरून विकासदर सात टक्के होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जागतिक पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीतही उपभोग आणि गुंतवणुकीसारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत कामगिरी करेल, असा विश्वास जागतिक बँकेने आज प्रसिद्ध केलेल्या भारताच्या विकासाबाबतच्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे.

चांगला मॉन्सून आणि देशांतर्गत मागणी यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढीच्या दराच्या अंदाजात वाढ केली आहे, असे जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ रेंन ली यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रातील वाढीमुळे ग्रामीण भागातील मागणीलाही चालना मिळेल; तसेच उत्पादन क्षेत्रातील मध्यमवाढही संतुलित केली जाईल, तर सेवा क्षेत्राची वाढ भक्कम राहील, असेही या अहवालात म्हटले आहे. 

भारतातील सार्वजनिक निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे सरकारच्या खर्चात कपात झाल्याने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावला होता. एप्रिल ते जून तिमाहीत विकासदर ६.७ टक्के नोंदवण्यात आला होता. मात्र, आगामी काळात अर्थव्यवस्था चांगली प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदर ७.२ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत त्यात मोठी घसरण असून, आर्थिक वर्ष २०२४च्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांच्या वाढीमुळे या वर्षासाठी विकासदर ८. टक्के होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) जुलैमध्ये भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनासाठी (जीडीपी) वाढीच्या अंदाजात २० आधारभूत अंकांनी वाढ करून तो सात टक्के केला आहे. 'आयएमएफ'नेही मागणीतील लक्षणीय वाढ, विशेषतः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या सुधारणेमुळे मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या अपेक्षेने विकासदराच्या अंदाजात वाढ केली असल्याचे म्हटले आहे.

'नोमुरा'कडून अंदाजात घट
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर कमी झाल्यामुळे 'नोमुरा'ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकासदराचा अंदाज आधीच्या ६.९ टक्क्यांवरून ६.७ टक्के केला आहे, तर गोल्डमन सॅक आणि जे. पी. मॉर्गन या संस्थांनी भारताचा विकासदर ६.५ टक्के राहील, हा पूर्व अंदाज कायम ठेवला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter