भारताची न्यायदेवता झाली 'डोळस'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
भारताची न्यायदेवता
भारताची न्यायदेवता

 

सर्वोच्च न्यायालयात आज न्यायदेवेतच्या नव्या मूर्तीचे अनावरण झाले. नव्या पुतळ्याच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. तसेच, मूर्तीच्या एका हातात तराजू कायम ठेवला असला तरी दुसऱ्या हातातील तलवार काढून त्याऐवजी भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याचे, त्यात सुधारणा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वसाहतवादाची अनेक प्रतीकेही बदलण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय 'दंड' संहिता जाऊन 'न्याय' संहितेची देशात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या बदलामध्ये आता न्यायदेवतेच्या पुतळ्याचीही भर पडली आहे. न्यायाधीशांच्या वाचनालयामध्ये नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे. न्यायदेवतेच्या पूर्वीच्या मूर्तीच्या डोळ्यांवर काळी पट्टी लावलेली होती. तिच्या डाव्या हातात तलवारही होती.
शिवाय, तिचे कपडे ग्रीक पद्धतीचे होते.

 नवी मूर्ती तयार करताना तिचे भारतीयीकरण करण्यात आले असून डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. तलवार जाऊन हातात 'भारतीय संविधान' आले आहे. ग्रीक पद्धतीचे कपडे जाऊन त्याऐवजी न्यायदेवतेने साडी, अंगावर भारतीय नेपद्धतीचे दागिने आणि डोक्यावर मुकुट दाखविण्यात आला आहे. भारतीय कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेला प्राधान्य देत नाही, असे न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये केलेल्या बदलातून सुचविले आहे. तसेच, भारतीय न्याय सर्वांकडे समान नजरेने पाहतो, असे उघड्या डोळ्यांमधून सुचविले आहे; तर हिंसाचाराच्या नाही, तर देशातील कायद्यानुसारच न्यायदान केले जाईल हे संविधानातून सुचविले आहे.

डोळ्यांवर पट्टी आणि हातात तलवार असलेली न्यायदेवतेची मूर्ती ही ग्रीक कथांमधील 'जस्टीलिया देवी'ची मूर्ती आहे. रोमन सम्राट ऑगस्टस याने या मूर्तीचा वापर सुरू केला होता. मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टीचा अर्थ, न्याय हा गरीब- श्रीमंत भेद न मानता समान असतो, असा सूचित केला जात होता. न्याय हा अंतिम आणि वेगवान असतो हे दर्शविण्यासाठी मूर्तीच्या हातात तलवार होती.