"संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त उपकरणे निर्माण करून या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी पुढचे पाऊल टाकण्याची योग्य वेळ आली आहे." असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमध्ये (सीडीएम) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपती ध्वजप्रदान कार्यक्रमानिमित्त त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
"संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी उत्पादनांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. मेक इन इंडिया, इझ ऑफ डुइंग बिझनेस आणि डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉर यांसारख्या उपक्रमांतून परकी आणि भारतीय गुंतवणूकदारांना संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे." असेही द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, संरक्षण क्षेत्रातील अनेक उत्पादनांच्या आयातीऐवजी ती देशात बनविण्यावर सरकार भर देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट नेमके काय आहे हे समजावून घेत ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी संरक्षण दलातील प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत आत्मीयतेने आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी केले.
भारताचा दृष्टिकोन व्यापक
"संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाबाबत भारताचा दृष्टिकोन व्यापक असून, पारंपरिक सैन्य दलांचे आधुनिकीकरण आणि कृत्रिम बुद्धीमत्ता, ड्रोन, सायबर युद्धाला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता आणि अंतराळ संरक्षण तंत्रज्ञान यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे हे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे." असे मुर्मू यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारताने लक्ष केंद्रित केले, असून विविध स्तरावरील लष्करी आणि आर्थिक उपक्रमात भारत सहभागी होत आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या संरक्षण विषयक चर्चामध्येही भारताचे महत्त्व वाढत आहे, असे मुर्मू यांनी सांगितले.
जागतिक शांततेतही योगदान
आत्मनिर्भरता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्य यांच्या साहाय्याने भारत केवळ आपल्या सीमांचेच संरक्षण करत नसून जागतिक स्तरावर शांतता नांदावी आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठीही योगदान देत असल्याचे प्रतिपादनही मुर्मू यांनी राष्ट्रपती ध्वजदानाच्या कार्यक्रमात बोलताना केले. देश विकासाची नवनवी क्षितिजे गाठत असताना संरक्षण क्षेत्रदेखील विकसित होणे आवश्यक असून सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये देश शक्तीसंपन्न आणि सहकार्यास अग्रेसर राहणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या
-
संरक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी बदलत्या काळानुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे
-
अलीकडील काळातील युद्ध ही युद्धभूमीबाहेरही लढली जात आहे. त्यामुळेच हे बदल लक्षात घेत बदलत्या संरक्षण आयामांबाबत सदैव दक्ष राहा
-
२०४७मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आणि सामूहिक स्वरूपात दिलेले योगदान मोलाचे ठरणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter