भारताने गाठला १०० गिगावॅट सौरऊर्जा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 23 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत करत भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमता अधिक वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

अक्षय ऊर्जा देशाच्या स्वच्छ, हरित भविष्यासाठी महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या १० वर्षांत भारताचा ऊर्जा प्रवास ऐतिहासिक आणि प्रेरणादायी राहिला आहे. सौर पॅनेल, सौर पार्क आणि छतावरील सौर प्रकल्प यासारख्या उपक्रमांनी क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. त्यामुळेच आता भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

केंद्रीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याबरोबरच जगाला एक नवीन मार्ग दाखवत आहे. भारताने सौरऊर्जा उत्पादनातही लक्षणीय प्रगती केली आहे. २०१४ मध्ये देशात मर्यादित सौरऊर्जा मॉड्यूल उत्पादन क्षमता फक्त २ गिगावॅट होती. गेल्या दशकभरात, २०२४ मध्ये ही वाढ ६० गिगावॅट झाली आहे. त्यामुळे भारत सौरऊर्जा उत्पादनात जगात अग्रेसर आहे. सौर ऊर्जेतील हा १०० गिगावॅटचा टप्पा भारताच्या आत्मनिर्भर ऊर्जा भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे."

२०२४ मध्ये दुप्पट वाढ
एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेत ४७ टक्के सौर ऊर्जा आहे. २०२४ मध्ये विक्रमी २४.५ गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेची भर पडली, जी २०२३ च्या तुलनेत स्थापित सौर ऊर्जेत दुप्पट वाढ झाली आहे. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये आहेत. २०२४ मध्ये भारतातील छतावरील सौरऊर्जेची ४.५९ गिगावॅट नवीन क्षमता स्थापित केली गेली. २०२३ च्या तुलनेत ही ५३ टक्के जास्त आहे. या वाढीचे प्रमुख कारण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असल्याचे बोलले जात आहे.