भारत हा जगातील आघाडीचे संपत्ती केंद्र म्हणून उदयास आला असून, देशातील अब्जाधीशांची संख्या १९१ वर पोहोचली आहे, तर एक कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या (एचएनडब्ल्यूआय) अतिश्रीमंतांची संख्या ८५,६९८ झाली आहे. ही संख्या पुढील पाच वर्षात ९३,७५३ वर पोहोचण्याचा अंदाज आहे. संख्येच्या आधारावर भारताने जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या देशांच्या यादीत अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथे स्थान पटकावले आहे. नाइट फ्रैंकच्या ताज्या ग्लोबल वेल्थ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, देशातील अब्जाधीशांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे एकूण संख्या १९१ झाली आहे. २०२३ मधील १६५ वरून ही संख्या २६ ने वाढली आहे. २०१९ मध्ये फक्त सात अब्जाधीश होते. २०२४ मध्ये भारतातील एक कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या मागील वर्षातील ८०,६८६ च्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढली आहे.
जागतिक स्तरावर ही संख्या ४.४ टक्क्यांनी वाढून २३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, १० कोटी अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या अल्ट्रा हाय नेट वर्थ व्यक्तींची (यूएचएनडब्ल्यूआय) लोकसंख्या पहिल्यांदाच एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. जगभरातील संपत्तीच्या वाढत्या कलाचे हे प्रतिबिंब आहे. श्रीमंताच्या वाढीच्या प्रमाणामुळे फ्रान्स, ब्राझील आणि रशियासारख्या इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसह, वाढती संपत्ती केंद्र म्हणून आपले स्थान सुरक्षित करण्यास भारताला मदत झाली आहे. संपत्ती निर्मिती आता अमेरिका आणि युरोपपुरती मर्यादित नाही. आशिया आणि इतर देशही यात मोठी भूमिका बजावत आहेत.
अमेरिकेचे वर्चस्व कायम
जगातील प्रमुख संपत्ती निर्माता देश म्हणून अमेरिका अजूनही वर्चस्व गाजवत आहे. जगभरातील जवळजवळ ४० टक्के उच्च उत्पत्रधारक व्यक्ती अमेरिकेत राहतात. चीनमध्ये ही संख्या २० टक्के असून, जपानमध्ये केवळ पाच टक्के आहे. भारताने वेगवान आर्थिक वाढीमुळे संपत्ती निर्मितीत लक्षणीय कामगिरी केली आहे. उच्च उत्पन्नधारक लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. पा आकडेवारीत अमेरिकेने २०२४ मध्ये, जगात आघाडी घेतली आणि त्यांच्या लोकसंख्येत ५.२ टक्के वाढ झाली. आशियाने त्यानंतर पाच टक्क्यांनी वाढ केली, तर आफ्रिकेने ४.७ टक्क्यांनी वाढ नोंदवल. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील संख्येत ३.९ टक्क्यांनी वाढ झाली. आशियाई आणि उत्तर अमेरिकी बाजारपेठांशी असलेल्या धोरणात्मक संबंधांमुळे वाढली.
स्टार्ट-अपचे योगदान मोलाचे
एचएसबीसीचे जागतिक अर्थशास्त्रज्ञ जेम्स पोमेरॉय यांनी या संपत्तीवाडीचे श्रेय कमी व्याजदर आणि शेअरसारख्या जोखीम मालमत्तेवरील आकर्षक परतावा यांच्या संयोजनाला दिले आहे. भारताची उल्लेखनीय प्रगती स्टार्ट-अप परिसंस्थेमुळे झाली असून, स्मार्टफोनची वाढती उपलब्धता आणि उद्योजकतेच्या वाढत्या संस्कृतीमुळे चालना मिळाली आहे. भारत आणि फिलीपिन्समध्ये स्टार्ट अपने अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान दिले आहे. हे उद्योजक नंतर अतिश्रीमंत बनू शकतात. तंत्रज्ञान आधारित हे उद्योग आशियाच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणत आहे. असे पोमेरॉय यांनी म्हटले आहे. सुलभ डिजिटल साधनांच्या मदतीने तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांच्या उच्यामुळे नवोपक्रम आणि संपत्ती निर्मितीसाठी अनुकूल वातावरणा निर्माण झाले आहे. भारतातील वेगाने वाढणारा उद्योजक वर्ग संपत्ती निर्मितीतील एक प्रमुख घटक आहे.