भारत आणि पाकिस्तान सीमा क्षेत्रामध्ये या दोन्ही देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष मागील काही वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाचा दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) तणावाच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काल (दि.२१) पूंछ सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये एक फ्लॅग मिटींग पार पडली. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांमधील ही पहिलीच बैठक आहे. यापूर्वी फ्लॅग मिटिंग २०२१ मध्ये झाली होती.
शुक्रवारी ही उच्चस्तरिय बैठक पार पडली असून, यामध्ये दोन्ही देशांच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी (ब्रिगेडियर रँक) यांचा सहभाग होता. पुंछ सेक्टरमधील चाका दा बाग याठिकाणी ही बैठक साधारण ७५ मिनिटे सुरु होती. त्यामुळे यावेळी झालेल्या या बैठकीमध्ये नेमके काय घडले याची चर्चा जागतिक स्तरावरही पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्कन-दा-बाग क्रॉसिंग पॉइंट इथे पार पडलेल्या फ्लॅग मिटिंगमध्ये दोन्ही पक्षांच्या वतीने सीमा क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला. सोबतच दोन्ही देशांकडून संघर्षविरामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे २५ फेब्रुवारी २०२१ ला पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर जम्मू काश्मीर प्रांतातील घटनांमध्ये घट झाल्याचे चित्र दिसत होते.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मात्र हा तणाव पुन्हा वाढताना दिसला. ४-५ फेब्रुवारीला पुंछमधील कृष्णा सेक्टर इथे एलओसीपलिकडे भारतीय सीमा क्षेत्रात शेजारी राष्ट्राकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यानंतर ८ फेब्रुवारीला राजौरीच्या केरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेनजीकसुद्धा गोळीबार झाल्याची बाब निदर्शनास आली. यानंतरही या घटना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या.
सध्याच्या घडीला जम्मू काश्मीर प्रांतामध्ये भारतीय लष्कराने अनेक भागांमध्ये गस्त वाढवली असून, बर्फवृष्टी कमी झाल्याने सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीसाठीच्या अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.