सायबर युद्ध आणि दहशतवादासारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांसह, वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताने सज्ज असले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. भू-राजकीय गतिशीलतेने सुरक्षेची स्थिती बदलली असल्याने राष्ट्रीय व जागतिक परिस्थितीचे सखोल आकलन होण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मुर्मू म्हणाल्या,‘‘हवामान बदलाच्या मुद्द्याला नवीन आयाम प्राप्त होत असून तो समजून घेऊन व्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. आपल्या सशस्त्र दलाचे अधिकारी भविष्यातील वाढत्या आव्हानांचा सक्षमपणे सामना करतील, असा विश्वास आहे. वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीत आपण कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे.
भू-राजकीय गतिशीलतेमुळे सुरक्षेची स्थिती बदलली असल्याने राष्ट्रीय व जागतिक परिस्थितीचे सखोल आकलन करण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे. आपण केवळ आपल्या देशहिताचे रक्षणच केले पाहिजे, असे नव्हे तर सायबर युद्ध, दहशतवादासारख्या नवीन राष्ट्रीय सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे,’’ असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या,‘‘देशातील संरक्षण उद्योग बदलत्या तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार पावले टाकत आहे. देशातील संरक्षण उद्योगांकडून जगातील १०० पेक्षा अधिक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात केली जात आहे. गेल्या दशकभरात संरक्षण उद्योग ३० पटींनी वाढला असून यात मेक इन इंडिया उपक्रमाने मोलाचे योगदान दिले आहे, ’’ असेही मुर्मू यांनी नमूद केले.
काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट
जम्मू आणि काश्मीरमध्ये थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र नोंदविली गेली. बहुतेक भागांत रात्रीचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. श्रीनगरमध्ये ते -२.१ नोंदविले गेले. आधीच्या रात्रीच्या तुलनेत यात दीड अंशांची घट झाली. दक्षिण काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंडमध्ये -३ अंश सेल्सिअस तापमान होते. अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प समजल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये सर्वांत कमी म्हणजे -५ अंश सेल्सिअस तापमान होते.
याविषयी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या, "भारताचा उदय होत असून संरक्षणासह विविध क्षेत्रांतील आपल्या देशाची भूमिका जगाने मान्य केली आहे. सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व आव्हानांवर मात करण्यासाठी देश स्वावलंबन व स्वदेशीकरणाकडे वाटचाल करत आहे. भारत एक प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होत आहे आणि एक विश्वासार्ह संरक्षण भागीदार व निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे."