भारत आणि मलेशियाने द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील पहिली बैठक आज ७ जानेवारीला नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदचे महासंचालक राजा दातो नुशीरवान बिन जैनल आबिदीन हे उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर महत्वाची चर्चा झाली.
या महत्वपूर्ण बैठकीत दोन्ही देशांनी जागतिक आणि राष्ट्रांच्या सीमा सुरक्षेवर सखोल चर्चा झाली. संरक्षण आणि सागरी क्षेत्रातील चालू द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सहमती दाखवली. तसेच दहशतवादविरोधी आणि समन्वयात्मक कारवाई, सायबर सुरक्षा आणि समुद्री सुरक्षा क्षेत्रात एकमेकांना सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली. याशिवाय, पृथ्वीच्या गाभाऱ्यात मिळणारी दुर्मिळ खनिज संपत्ती मिळण्याच्या उद्देशाने चर्चा झाली. दोन्ही देशांनी आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रात एकमेकांना सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी बैठक घेण्याचा निर्णय
जागतिक आणि राष्ट्रीय विषयांवरील चर्चासत्राला अधिक सुसंगत आणि प्रभावी बनवण्यासाठी दरवर्षी बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सततच्या चर्चासत्रांमुळे भारत आणि मलेशियाच्या सुरक्षा सहकार्याला सातत्य आणि दृढता निर्माण होईल, असे म्हटले गेले.
मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये भारत दौरा केल्यामुळे आजच्या या बैठकीला वेग आल्याचे म्हटले जात आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांचा तो दौरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणामुळे घडून आला होता. त्यावेळच्या दौर्यामध्ये दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करून त्याला व्यापक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यान भारत आणि मलेशिया यांनी सुरक्षा सहकार्याला प्राधान्य देण्यावर सहमती व्यक्त केली होती.
पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि मलेशिया यांच्यात संरक्षण, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती. ही बैठक त्याच दिशेने एक ठोस पाऊल आहे आणि दोन्ही देशांमधील विश्वास आणि सामंजस्य मजबूत करण्याच्या दिशेने घेतले गेलेले पाऊल आहे.
भारत-मलेशिया संबंधांमध्ये नवा अध्याय
भारत आणि मलेशियात पार पडलेली बैठक दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांना बळकट करेल. तसेच हिंद प्रांतात शांती आणि स्थिरतेसाठी एक नवीन भागीदारीची पायाभरणी करेल. या बैठकीनंतर भारत आणि मलेशिया यांच्यातील आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षा संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. ही बैठक आगामी काळात जागतिक सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दोन मित्र देशांमधील परस्पर सहकार्य आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.