म्यानमार येथे ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत कार्यरत असलेले भारतीय सैन्य.
म्यानमारमध्ये २८ मार्चतोो झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर भारतीय सैन्याच्या फील्ड हॉस्पिटलने आपली वैद्यकीय मदत अखंडपणे सुरू ठेवली आहे. म्यानमारमधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले. म्यानमारमधील या भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून, भारतीय सैन्याने आपल्या मानवीय जबाबदारीचा भाग म्हणून स्थापन केलेल्या या हॉस्पिटलद्वारे स्थानिकांना आधार दिला आहे.
वैद्यकीय सेवांचा विस्तार
भारतीय सैन्याच्या माहितीनुसार काल संध्याकाळपर्यंत या फील्ड हॉस्पिटलमध्ये २३ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याशिवाय १,३०० हून अधिक प्रयोगशाळा तपासण्या आणि १०३ एक्स-रे प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथक अहोरात्र कार्यरत असून, भूकंपग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत पुरवत आहे. हे हॉस्पिटल २०० खाटांचे असून याठिकाणी शस्त्रक्रिया आणि रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.
म्यानमारमधील मांडले विभागाचे मुख्यमंत्री म्यो आंग यांनी गुरुवारी या फील्ड हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी भारतीय वैद्यकीय पथकाच्या अथक सेवेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. “या संकटाच्या काळात भारतीय सैन्याने जी मदत केली, ती आमच्यासाठी अमूल्य आहे. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत,” असे म्यो आंग म्हणाले. तसेच, मा सोए येईन टिक थिट मठातील प्रमुख भिक्षू यू विराथू यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन भारतीय सैन्याच्या कार्याचे कौतुक केले.
ऑपरेशन ब्रह्मा
म्यानमारमधील या भूकंपानंतर भारताने तातडीने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत भारताने शोध आणि बचाव (SAR), मानवीय मदत, आपत्ती निवारण आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. फील्ड हॉस्पिटल हा या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या हॉस्पिटलमध्ये ११८ जणांचे वैद्यकीय पथक कार्यरत असून, यामध्ये महिला आणि बालकांसाठी विशेष काळजी घेणारी युनिट्सही आहेत. आतापर्यंत या हॉस्पिटलने १४५ रुग्णांवर उपचार केले असून, त्यापैकी ३४ जणांना पुढील काळजीसाठी दाखल करून घेण्यात आले आहे.
म्यानमारमधील परिस्थिती
अल जझीरा वृत्तवाहिनीने म्यानमारच्या सरकारी टीव्ही अहवालाचा हवाला देत सांगितले की, या भूकंपामुळे आतापर्यंत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारच्या लष्करी सरकारने या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती युद्धविराम जाहीर केला आहे. मांडले हे म्यानमारमधील दुसरे सर्वात मोठे शहर असून, या भूकंपाचा येथे सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक इमारती, पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाले असून, हजारो लोक जखमी झाले आहेत.
भारत-म्यानमार मैत्रीचा दृढ संकल्प
भारताने नेहमीच आपल्या शेजारी देशांना संकटकाळात मदत करण्याची परंपरा जपली आहे. ऑपरेशन ब्रह्मा ही त्याच परंपरेचा एक भाग आहे. भारत सरकारने या मोहिमेअंतर्गत म्यानमारला आतापर्यंत १५७ टनांहून अधिक मदत सामग्री पाठवली आहे. यामध्ये अन्नपदार्थ, औषधे, तंबू, ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्ज, सौर दिवे आणि जनरेटर यांचा समावेश आहे. भारतीय नौदलाच्या INS सातपुडा आणि INS सावित्री या जहाजांनी ४० टन मदत सामग्री यांगून बंदरात पोहोचवली. तर INS घडियालने ४४० टन मदत सामग्रीसह विशाखापट्टणमहून म्यानमारकडे प्रस्थान केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter