मुस्लीम विचारवंत आणि धर्मगुरू यांच्याशी चर्चा करताना डॉ. अल-इसा
'मुस्लीम वर्ल्ड लीग'चे महासचिव डॉ. मुहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री ते भारतात पोहोचले. त्यांचा मंगळावरचा दिवस अतिशय व्यग्रतेत गेला. यावेळी अनेक प्रस्तावित गाठीभेटी झाल्या. सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तर दुपारी ते एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. खुसरो फाउंडेशनने दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे आयोजित केलेल्या शांती परिषदेला त्यांनी संबोधित केले. यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही भाषण झाले.
तत्पूर्वी डॉ. अल-इसा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भारताच्या संविधानाचा गाभा, येथील विविधता यांसारख्या अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ही चर्चा सुमारे तासभर चालली. पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ आणि वर्ल्ड मुस्लीम लीग या दोहोंनी या मुलखातीविषयी ट्वीट करत माहिती दिली.
भारतातील महत्त्वाचे मुस्लीम विचारवंत, उलेमा यांचे डॉ. अल-इसा यांच्यासोबत रात्रीभोजाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील ओबराय हॉटेलमध्ये अजित डोवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा आमंत्रणाला मान देत डॉ. अल-इसा इप्सितस्थळी अगदी वेळेवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सौदी अरेबियाहून आलेले शिष्टमंडळही होते. डॉ. अल-इसा यांच्या स्वागतासाठी अजित डोवाल आयोजनस्थळी आधीपासूनच उपस्थित होते.
डॉ. अल-इसा कार्यक्रमस्थळी पोहोचताच डोवाल यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी डॉ. इसा यांची सर्वप्रथम भेट माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी, माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्याशी झाली. यावेळी बॉलरूममध्ये इतरही मान्यवर उपस्थित होते. जामिया मिल्लिया इस्लामिया च्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर, शिया गुरु कल्बे जव्वाद, 'अजमेर शरीफ दरगाह'चे नसीरुद्दीन चिश्ती, 'जमीयत उलेमा ए हिंद'चे महमूद मदनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वतः अजित डोवाल यांनी डॉ. अल-इसा यांचा सर्वांशी परिचय करून दिला. भोजनानंतर फोटोसेशनही झाले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉ. अल-इसा यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती. भारतातील बंधुभावाचे नाते खूपच दृढ असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
तत्पूर्वी सकाळी डॉ. अल-इसा एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. खुसरो फाउंडेशनने दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे आयोजित केलेल्या शांती परिषदेला त्यांनी संबोधित केले. यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही भाषण झाले. विविधेत एकता हे वैशिष्ट्य असलेला भारत सौहार्दपूर्ण सहजीवनाचे एक आदर्श मॉडेल आहे. भारत जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो, असे गौरवोद्गार डॉ. अल-इसा यांनी काढले. भारतीय मुस्लिमांना आपल्या देशावर आणि संविधानावर गर्व आहे. भारतातल्या धार्मिक सौहार्दाविषयी त्यांना प्रचंड अभिमान असल्याचे आम्हाला जाणवले, अशी पुस्तीही डॉ. अल-इसा यांनी यावेळी जोडली. यावेळी भारतीयांच्या विवेकाचेही (Indian Wisdom) त्यांनी कौतुक केले. भारतीयांच्या या प्रज्ञेविषयी आम्ही बरेच ऐकून आहोत. मानवतेसाठी त्याने भरीव योगदान दिले आहे, हे सांगायला डॉ. अल-इसा विसरले नाहीत.
भारतात विविध धर्मांचे, पंथांचे लोक राहतात, त्यामुळे शांततामय सहअस्तित्वासाठी धर्माधर्मांमध्ये सौहार्दपूर्ण नाते असणे आवश्यक असल्याने ही बाब भारतीयांच्या नसानसात भिनली आहे. शांततामय सहअस्तित्व हे इथे तळागाळापर्यंत रुजले आहे. त्यामुळे जगासाठी हे एक आदर्श रोल मॉडेल ठरेल याच शंका नाही. आम्ही 'मुस्लीम वर्ल्ड लीग'च्या माध्यमातून जगभरात शांतता, स्थिरता आणि सद्भावना वाढीस लागावी म्हणून प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये भारताची साथ आणि सहभाग आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.
जगातील मुस्लीमांचे प्रतिनिधत्व करणारी महत्त्वाची संस्था म्हणून 'मुस्लीम वर्ल्ड लीग'चा लौकिक आहे. अशा संघटनेच्या प्रमुखांचे उद्गारांना त्यामुळेच विशेष महत्त्व आहे. त्यांनी खुसरो फाउंडेशनच्या कार्यक्रमात काढलेले उद्गार भारत आणि सौदी यांच्यातील नात्याला नवे आयाम तर देईलच पण उदारमतवादी आणि सुधारणावादी इस्लामच्या मांडणीलाही पूरक ठरू शकेल.
- मलिक असगर हाशमी, दिल्ली
मुस्लीम वर्ल्ड लीग प्रमुख डॉ. अल-इसा यांच्या भारतभेटीशी संबंधित हे इतर लेखही वाचा :