इस्रायल अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नवी दिल्ली- इस्त्राइल आणि हमास संघटनेमध्ये तुंबळ युद्धाला तोंड फुटले आहे. संघर्षात अनेकांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहे. अनेकांना बेघर व्हायला लागले आहे. सध्या संघर्ष थांबण्याचे चिन्ह नाहीत. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्त्राइलमधील भारतीयांना परत आणण्यासाठी अजय ऑपरेशनची घोषणा केली आहे. युद्ध प्रदेशातील १८ हजार भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात येणार आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आले आहे. एक विशेष विमान आणि इतर सेवा यांची सोय करण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत.' 

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास गाफील असलेल्या इस्त्राइलवर भीषण हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की सुरुवातीला इस्त्राइलला सावरायला वेळ लागला. त्यानंतर इस्त्राइलने आक्रमक पवित्रा घेतला असून कठोर प्रतिहल्ला सुरु केला आहे. या हल्ल्यात १२०० दहशतवादी ठार झाल्याचे इस्त्राइलने सांगितले आहे.

माहितीनुसार, जवळपास १८ हजार भारतीय इस्त्राइलमध्ये राहत आहेत. युद्धाला तोंड फुटले असल्याने तेथील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आलंय. भारतात परत येऊन इच्छिणारे नागरिक याच्या माध्यमातून परत येऊ शकतात.

इस्त्राइलमधील भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी भारतात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांना पहिल्या विमानात बसवले जाईल. आज हे विशेष विमान भारताकडे रवाना होईल. त्यानंतर इतर भारतीयांना देखील परत आणता येईल.