भारत आणि फ्रान्स यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय घेतला. इतर जागतिक व्यासपीठांमध्ये आणि प्रकल्पांमध्येही एकमेकांना सहकार्य करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी आज मॅक्रॉन यांच्याबरोचर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत विविध मुद्दधांना स्पर्श करण्यात आला, पॅरिसमध्ये मंगळवारी (दि.१२) झालेल्या 'एआय' परिषदेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी आज 'एआय' क्षेत्राचा सार्वजनिक, आर्थिक आणि पर्यावरण हितासाठीही फायदा व्हावा, या मुख्यावर चर्चा केली.
मोदी व मॅक्रॉन यांनी संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. तसेच, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी काय पाऊले उचलता येतील, याबाबतही चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याचाही आढावा घेण्यात आला.
जे. डी. व्हान्स यांच्याशी भेट
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उपा आणि त्यांची दोन मुले इवान व विवेक यांचीही पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. मोदी आणि व्हान्स यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. विवेकच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी त्याचे अभिनंदनही केले.
मार्सेलीमध्ये नवी वकिलात
फ्रान्समधील मार्सेली शहरात भारताच्या नव्या वकीलातीचे उद्घाटन मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय समुदायाचे अनेक नागरिक उपस्थित होते. याआधी मोदी आणि मॅक्रॉन यांनी ऐतिहासिक माझार्गेज स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली.
भारतात गुंतवणुकीचे आवाहन
पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी आज चौदाव्या भारत-फ्रान्स सीईओ फोरमलाही संबोधित केले. भारतात वेगाने विकास होत असून येथे गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे आवाहन मोदींनी यावेळी फ्रान्समधील कंपन्यांना केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आणि फ्रान्समधील व्यापारी आणि आर्थिक संबंध वेगाने बाढत आहेत. तसेच, राजकीय स्थैर्य आणि निश्चित धोरणे यामुळे भारत हा जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे. इतरांचा विकास भारताच्या विकासाशी जोडला गेला आहे."
ते पुढे म्हणाले, म्हणाले, फ्रान्सचे कौशल्य आणि भारताची व्यापकता, फ्रान्सचे तंत्रज्ञान आणि भारताची बुद्धीमत्ता एकत्र आल्यास केवळ व्यापारच नाही, तर जागतिक पातळीवर बदल घडून येतील, असेही आवाहन मोदींनी केले.