भारताने कोळसा उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. २० मार्च २०२५ ला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ११ दिवस आधीच साध्य करण्यात आला आहे. मागील वर्षी भारताने ९९७.८३ दशलक्ष टन कोळसा उत्पादन केले होते.
याविषयी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री यांनी माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहले, “ऐतिहासिक कामगिरी! भारताने कोळसा उत्पादनात नवा विक्रम प्रस्थापित करत १ अब्ज टनांचा टप्पा पार केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम पद्धती वापरून आम्ही फक्त उत्पादन वाढवले तर शाश्वत आणि जबाबदार खाणकाम देखील सुनिश्चित केले आहे. ही मोठी उपलब्धी आपल्या वाढत्या वीज गरजा पूर्ण करेल. आर्थिक विकासाला गती देईल आणि प्रत्येक भारतीयासाठी उज्ज्वल भविष्य घडवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक ऊर्जा क्षेत्रात महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.”
याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट केले. ते म्हणाले, “भारतासाठी अभिमानाचा क्षण! १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार करणं ही मोठी उपलब्धी आहे. ही कामगिरी ऊर्जा सुरक्षितता, आर्थिक विकास आणि आत्मनिर्भरते प्रति आपल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. या यशामागे कोळसा क्षेत्रातील सर्व कामगारांची मेहनत आणि समर्पण आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा ऐतिहासिक क्षण शक्य झाला आहे.”
कोळसा उत्पादनामध्ये भारताने मोठी प्रगती केली असून, हे यश सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपन्या, खाजगी कंपन्या आणि देशभरातील ३५० हून अधिक कोळसा खाणींमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ५ लाख कामगारांच्या अथक मेहनतीमुळे शक्य झाले आहे. या कामगारांनी अनेक अडचणींवर मात करून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
भारताच्या ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी सुमारे ५५ टक्के ऊर्जेसाठी कोळशावर अवलंबून आहे. तर ७४ टक्के वीज कोळसा आधारित वीजनिर्मिती केंद्रांमधून तयार केली जाते. यामुळे भारताच्या ऊर्जेच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक विकासासाठी कोळसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
कोळसा उत्पादन वाढण्यामागे सरकारच्या धोरणात्मक सुधारणा महत्त्वाच्या ठरल्या आहेत. खनिज आणि खनिज (विकास आणि नियमन) कायद्यामध्ये सुधारणा, तसेच खाजगी कंपन्यांसाठी कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावाला परवानगी दिल्याने देशांतर्गत कोळसा उपलब्धता वाढली आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि परकीय चलनाची मोठी बचत झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत भारताच्या कोळसा आयातीमध्ये ८.४ टक्के घट झाली. यामुळे सुमारे $५.४३ अब्ज (₹४२,३१५.७ कोटी) परकीय चलनाची बचत झाली.
ही उपलब्धी केवळ कोळसा उत्पादनापुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या दीर्घकालीन ऊर्जेसुरक्षेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी मोठे पाऊल आहे. आधुनिक खाण तंत्रज्ञान, कार्यक्षम लॉजिस्टिक प्रणाली आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करून कोळसा क्षेत्र भारताच्या ऊर्जाक्षेत्राला मजबूत करत आहे. सातत्यपूर्ण सुधारणा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि जबाबदारीने नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यामुळे भारत ऊर्जाक्षेत्रात संपूर्ण आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter