भारत व चीनमध्ये लष्करी तणावाच्या समाप्तीनंतर गेल्या वर्षी भारत-चीन संबंधांत सकारात्मक प्रगती झाल्याची ग्वाही चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी दिली. येथे वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. वांग म्हणाले, की सीमा प्रश्नावरील मतभेदांचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झालेला नाही.
वांग म्हणाले, की रशियातील कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील यशस्वी वाटाघाटीनंतर गेल्या वर्षभरात चीन-भारत संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. दोन्ही देशांमधील संबंधांत दीर्घ काळ निर्माण झालेला तणाव संपल्यानंतर चीनचा भारतबाबत कसा दृष्टिकोन आहे, या प्रश्नाचे उत्तर दिले. कझान येथे झालेल्या बैठकीत शी आणि मोदी दोघांनीही द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या वाटाघाटीसंदर्भात धोरणात्मक मार्गदर्शन केले.
चीनच्या संसदेच्या येथे सुरू असलेल्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पत्रकार परिषदेत वांग यांनी सांगितले, की दोन्ही नेत्यांमध्ये कझान येथील वाटाघाटीनंतर या दोन्ही बाजूंनी सहमतीच्या मुद्द्यांचे प्रामाणिकपणे पालन केले, निश्चित केलेल्या सर्व स्तरांवर देवाणघेवाण आणि व्यावहारिक सहकार्य मजबूत केले आणि अनेक सकारात्मक परिणाम साधले आहेत.
पूर्व लडाखमधील शेवटचे दोन वादग्रस्त आणि संघर्षग्रस्त जागा असलेल्या देप्सांग आणि डेमचोक येथून सैन्य मागे घेण्याचा करार झाल्यानंतर भारत आणि चीनने गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात सैन्य माघीरीची प्रक्रिया पूर्ण केली. ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंधात चार वर्षांहून अधिक काळ असलेला तणाव संपुष्टात येण्यास मदत झाली.
अमेरिकेवर टीका
वांग यी यांनी यावेळी दक्षिण चीन सागरी क्षेत्रात चीनच्या प्रभुत्वाचा पुनरुच्चार केला. या क्षेत्रात अमेरिकेने 'छाया नाट्या 'द्वारे आमचा बागुलबुवा उभा केला आहे, अशी अमेरिकेवर त्यांनी टीकाही केली.