पूर्व लडाखमधील देमचोक आणि देपसांग या दोन संघर्षबिंदूंवरून भारत आणि चीनच्या लष्करी माघारीची प्रक्रिया आज पूर्ण झाली. आता लवकरच दोन्ही देशांचे लष्कर या ठिकाणी गस्त घालायला सुरूवात करणार असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. उद्या (ता.१) रोजी दिवाळसण असल्याने दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना मिठाईचे वाटप करून शुभेच्छा देतील.
दोन्ही देशांचे लष्कर हे या दोन ठिकाणांवर गस्त घालणार असल्याने त्यासाठी नेमकी कोणत्या घटकांना प्राथमिकता द्यायची याबाबतची सविस्तर बोलणी कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांदरम्यान होईल. या चर्चेमध्ये स्थानिक कमांडरचा समावेश असेल असे लष्कराने म्हटले आहे. या लष्करी माघारीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू होती. अखेरीस या चर्चेला कराराचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर तणावावरील तोडगा दृष्टिपथात आला होता. मूळ चर्चादेखील दोन टप्प्यांमध्ये झाली होती.
राजनैतिक आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर चर्चा करण्यात आली होती. कराराचा मसुदा ठरविताना मात्र या चर्चेमध्ये कोअर कमांडर दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते. मागील आठवड्यामध्येच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. गलवानमधील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. मागील आठवड्यामध्ये या चर्चेला कराराचे स्वरूप आले होते. पुढे ‘ब्रिक्स’ देशांच्या संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यावर मोहोर उमटविली होती.
अतिक्रमण काढले जाणार
माघारीचे ठरल्यानंतर भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन ठिकाणी २०२० ची स्थिती लागू करण्याबाबत मतैक्य झाले होते. चिनी लष्कर या भागातील अतिक्रमण काढून टाकणार आहे. गस्तीच्या अनुषंगाने देखील प्रस्ताव तयार असून त्यावर दोन्ही देश एकत्रित तोडगा काढतील असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.