राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. मेहजबीन सय्यद यांचे संशोधकांना मोलाचे मार्गदर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्रात संशोधन पेपरचे प्रकाशन करताना डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सय्यद मेहजबीन, दत्तात्रय पाटील आदी.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्रात संशोधन पेपरचे प्रकाशन करताना डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सय्यद मेहजबीन, दत्तात्रय पाटील आदी.

 

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 'भारत आणि बौद्धिक संपदा हक्क' या विषयावर नुकतेच एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात १६४ संशोधकांनी भाग घेतला, तर ३३ संशोधक आणि प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.

चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांनी भूषवले. यावेळी डॉ. सय्यद मेहजबीन, व्यापारी विजय मर्चेला, उद्योजक कृष्णा तोडकर, आणि जुनेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. इंद्रजीत भगत, प्रा. सुनील भोसले आणि प्रा. भारत पल्लेवाड यांचाही व्यासपीठावर उपस्थिती होती. या चर्चासत्रात १६४ जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, त्यात प्राध्यापक, संशोधक आणि काही विद्यार्थी होते. याव्यतिरिक्त, ४५ संशोधक आणि प्राध्यापक ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले. डॉ. सय्यद मेहजबीन यांनी 'भारतात बौद्धिक संपदा संरक्षण आणि त्याची व्यावसायिक गरज' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी 'बौद्धिक संपदा हक्क' हे आधुनिक व्यवसायाच्या यशाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, “संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना चालना देण्यासाठी बौद्धिक संपदा हक्क खूप महत्त्वाचे आहेत.” 

यावेळी राज्यातील विविध महाविद्यालयांतील १६ प्राध्यापकांनी ऑफलाईन शोधनिबंध सादर केले. प्राध्यापक श्रेणीत डॉ. विक्रम धन्वे, तर संशोधक श्रेणीत पूजा तांदळे यांना 'बेस्ट पेपर प्रेझेंटेशन'चे पारितोषिक देण्यात आले. तृतीय सत्रात डॉ. संदीप वंजारी आणि डॉ. मुकुंद राजपंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संशोधक आणि प्राध्यापकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाचे नागेश जोंधळे आणि साक्षी शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. तर सुनील भोसले आणि डॉ. इंद्रजीत भगत यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मुकुंद राजपंखे यांनी चर्चासत्राचा अहवाल सादर केला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter