काही वेळातच राजधानीत दुमदुमणार मराठीचा गजर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
९८ वे  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 

सरहद संस्थेच्या वतीने राजधानी दिल्लीमध्ये ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनात ७० पेक्षा जास्त नामांकित प्रकाशक संस्थांचा सहभाग असेल. यावर्षी संमेलनात देशभरातील विविध शासकीय, अशासकीय तसेच खासगी वितरक संस्थांचे एकूण १०६ स्टॉल्स असतील. यामुळे दिल्लीत मराठी साहित्याचा मोठा गजर होणार आहे.

गेल्या वर्षी अमळनेरमध्ये झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्री फार कमी झाली होती. त्यामुळे अनेक प्रकाशक संस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी संमेलनात साहित्याची विक्री होण्यास अडचणी आल्याने काही संस्थांचे भाडेही वसूल होऊ शकले नव्हते. याचे गांभीर्य लक्षात घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद संस्थेने यावर्षी पुस्तकांची विक्री व इतर साहित्य स्टॉल्ससाठी चांगले नियोजन केले आहे.

यावर्षी प्रत्येक स्टॉलच्या प्रतिनिधींना दिल्लीमध्ये राहण्यासाठी सवलत दिली आहे. तसेच इतर अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक प्रसिद्ध प्रकाशकांनी या संमेलनात स्टॉल उभारले आहेत. दिल्लीतील ९८ व्या संमेलनाच्या आयोजनामुळे स्टॉल्सची संख्या वाढली आहे आणि पुस्तकांची विक्री अधिक चांगली होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या संमेलनात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या नव्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यामुळे दिल्लीतील मराठी साहित्यप्रेमींना नवा साहित्य अनुभव मिळणार आहे. यावर्षी संमेलनाच्या आयोजनामध्ये प्रकाशकांना एक नवीन प्रेरणा मिळणार असून, त्यांची विविध अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दिल्लीत ७१ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीकरांना याच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि ग्रंथसंपदा खरेदी करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. यावर्षी विविध कार्यक्रमांसह पुस्तक विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

याविषयी बोलताना अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, “दिल्लीतील संमेलनात नामांकित प्रकाशन संस्‍थांमध्ये मराठी प्रकाशकांची संख्या लक्षणीय आहे. स्टॉलसाठी यंदा माफक भाडे आकारले आहे. स्टॉलबरोबर असलेल्या एका व्यक्तीची निवासाची सोयही केली आहे. तसेच अन्य सेवा-सुविधाही उपलब्ध केल्या आहेत.”

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे म्हणाल्या, “दिल्लीत ७१ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त दिल्लीकरांना मराठी साहित्य, ग्रंथसंपदा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनात विविध कार्यक्रमांसह पुस्तक विक्रीला दिल्लीकरांसह मराठी साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter