इम्फाळ - मणिपूरमध्ये आज काही संशयित दहशतवाद्यांनी जिरिबाम जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर आणि त्या शेजारीच असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर बेछूट गोळीबार केला. सावध असलेल्या 'सीआरपीएफ'च्या जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देत ११ दहशतवाद्यांना ठार मारले. भर दुपारी झालेल्या या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
जिरीबाम जिल्ह्यातील जाकुराडोर कारोंग गावात ही चकमक झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या गणवेशासारखेच कपडे परिधान केलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या दहशतवाद्यांनी दुपारी अडीच वाजता बोरोबेक्रा पोलिस ठाण्यावर आणि 'सीआरपीएफ'च्या छावणीवर बेछूट गोळीबार केला.
काही दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्याजवळच असलेल्या एका बाजारात घुसत काही दुकाने पेटवून दिली. तसेच काही घरांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यामुळे जोरदार चकमक सुरू झाली. या चकमकीत ११ दहशतवादी मारले गेले. सुमारे तासभर ही चकमक सुरू होत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले.
या दोघांना रुग्णालयात दाखल केले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चकमकीनंतर पोलिसांनी परिसरात जमावबंदी लागू केली आहे. 'सामाजिक शांतता आणि सौहार्दाला धक्का पोहोचविण्यासाठी किंवा दंगल घडवून आणत नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत' असल्याचे पोलिसांनी सांगत गस्त सुरू केली आहे.
यापूर्वीही हल्ले बोरोबेना विभागात जून महिन्यापासून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. जिरिबाम जिल्ह्यातील हा सर्वाधिक संघर्षग्रस्त भाग आहे. मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी ३१ वर्षांच्या एका महिलेला गोळ्या घालून ठार मारले होते. या हल्ल्यावेळी सहा घरेही पेटवून देण्यात आली होती.
नागरिकांचे अपहरण?
हल्ला झालेल्या पोलिस ठाण्याच्या परिसरातच मदत छावणीही आहे. चकमकीनंतर या छावणीतील पाच जण बेपत्ता झाल्याचे लक्षात आले आहे. जवानांच्या प्रत्युत्तरानंतर माघार घेताना दहशतवाद्यांनी या नागरिकांचे अपहरण केले की गोळीबारामुळे घाबरून हे नागरिक दुसरीकडे लपून बसले, हे अद्याप समजलेले नाही. या पाच जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे शव पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.