छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी काल (दि.६) दुपारी २.१५ च्या सुमारास ‘आयईडी’चा स्फोट घडवून लष्कराचे वाहन उडवून दिले. या हल्ल्यामध्ये जिल्हा राखीव पोलिस दलाचे (डीआरजी) आठ जवान हुतात्मा झाले असून वाहनाचा चालकही मरण पावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मागील दोन वर्षांतील हा नक्षलवाद्यांचा हा दुसरा सर्वांत मोठा हल्ला आहे.
येथील अम्बेली खेड्याजवळील कुतरू पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. नक्षलवाद्यांविरोधातील शोध मोहीम आटोपून सुरक्षा दलाचे जवान स्कॉर्पिओमधून परतत असताना जमिनीत पुरण्यात आलेल्या ‘आयईडी’चा स्फोट घडवून आणण्यात आला अशी माहिती बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. जिल्हा राखीव पोलिस दल हे राज्य पोलिस यंत्रणेअंतर्गत काम करते.
आज नेमका याच दलाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तेथील दृश्ये विचलित करणारी होती. स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूट खोल खड्डा पडला होता. काँक्रीटचा रस्ताही दुभंगला होता. हुतात्मा झालेल्या जवानांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या शीटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.
या स्फोटानंतर जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा तुकडा एका झाडावर २५ फूट उंचीवर अडकून पडला होता त्यावरून या स्फोटाची तीव्रता समजू शकते. या हल्ल्याबाबत बोलताना मुख्यमंत्री विष्णूदेव साय म्हणाले की नक्षलवाद्यांना नैराश्य आले असून या नैराश्यापोटीच त्यांच्याकडून अशा पद्धतीने हल्ले केले जात आहेत.
या जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. या चकमकीमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना मी करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्येही मी सहभागी आहे. दरम्यान २६ एप्रिल २०२३ रोजी घडवून आणण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये दहा पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. हे जवान देखील शेजारील दंतेवाडा जिल्ह्यातील शोध मोहीम आटोपून परतत होते, तेव्हाच हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, "नक्षलवाद्यांचा हा भ्याड स्वरूपाचा हल्ला असून त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. या जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. छत्तीसगड आणि बस्तर हे लवकरच नक्षलवाद मुक्त होईल."
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "विजापूरमधील हल्ल्याचे वृत्त ऐकून मला अतीव दुःख झाले आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत नक्षलवाद संपवून दाखवू."