युरोपियन युनियनच्या अध्यक्षांच्या भारतात महत्त्वाच्या गाठीभेटी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत युरोपियन युनियनचे कॉलेज ऑफ कमिशनर्स देखील आहेत. उर्सुला वॉन डेर लेन यांची ही तिसरी भारत भेट आहे. 

यापूर्वी त्यांनी द्विपक्षीय भेट आणि G20 नेतृत्व परिषदेत सहभागी होण्यासाठी एप्रिल २०२२ आणि सप्टेंबर २०२३ मध्ये भारताचा दौरा केला होता. युरोपियन कॉलेज ऑफ कमिशनर्सचा एकत्रितपणे हा त्यांचा पहिलाच भारताचा औपचारिक दौरा असेल.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उर्सुला वॉन डेर लेन यांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार आहे. तसेच भारत- EU व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची बैठक आणि द्विपक्षीय बैठक होणार आहे. याच्या माध्यमातून भारत आणि युरोपियन युनियन यांच्या संबंधांना आणखी बळकटी मिळणार आहे. या भेटीचे प्रमुख उद्दिष्ट दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे आहे. 

उर्सुला वॉन डेर लेन यांनी भारतात येताच अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत येताच उर्सुला वॉन डेर लेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली. त्यांनी लिहले, “माझ्या आयुक्तांच्या टीमसह मी दिल्लीत पोहचले आहे. संघर्ष आणि तीव्र स्पर्धेच्या युगात तुम्हाला विश्वासू मित्रांची गरज आहे. युरोपसाठी भारत हा एक मित्र आणि सामरिक सहयोगी आहे. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करेन.”
 

अनुप्रिया पटेल यांनी उर्सुला वॉन डेर लेन यांची भेट घेतल्यानंतर लिहले, “सरकारच्यावतीने दिल्लीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांचे स्वागत करताना आनंद झाला. मला खात्री आहे की, त्यांच्या या दौऱ्यात विविध क्षेत्रात भारत आणि युरोपमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करेल. त्यांना राजधानी दिल्लीत राहण्यासाठी शुभेच्छा.”

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी युरोप आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी वाढविण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक भेटीमध्ये संपूर्ण EU कॉलेज ऑफ कमिशनर्सचे नेतृत्व केले. या भेटीमध्ये मुक्त व्यापार करार, तंत्रज्ञान, हवामान बदल आणि जागतिक सुरक्षा यावर चर्चा करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी आणि वॉन डेर लेन यांच्यात या विषयांवर सखोल चर्चा होईल.

वॉन डेर लेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेऊन त्यांच्या धोरणात्मक संबंधांना उंचावण्यासाठी चर्चा केली. शांततेच्या वचनबद्धतेचे प्रतीक असलेल्या राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून या भेटीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. जागतिक आव्हानांच्या काळात युरोपचा एक विश्वासू मित्र आणि धोरणात्मक सहयोगी म्हणून भारताची भूमिका अधोरेखित करून दोन्ही नेत्यांनी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या भेटीसंदर्भात माहिती देत म्हटले, “युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांच्याशी बोललो. युरोपसोबत भारताच्या संबंधांना पुन्हा ऊर्जा देण्याच्या त्यांचे विचार कौतुकास्पद आहे. या भेटीदरम्यान भारतीय मंत्री आणि EU कॉलेज ऑफ कमिशनर यांचा व्यापक सहभाग हा भारत-EU संबंधांच्या महत्वाची साक्ष देतो.”
२००४ पासून भारत आणि युरोपियन युनियनमध्ये धोरणात्मक भागीदार आहेत. त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचा विस्तार झाला आहे. विविध क्षेत्रांमध्ये हे संबंध अधिक बळकट झाले आहेत. उभय देशांमधील धोरणात्मक भागीदारी तिसऱ्या दशकात प्रवेश करीत आहे. उर्सुला वॉन डेर लेन यांच्या भेटीमुळे भविष्यातील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी प्राप्त होणार आहे.

युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील सामरिक भागीदारी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची आहे. व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, हवामान बदल, आणि सुरक्षा यावर या भागीदारीचे केंद्रित लक्ष आहे. वॉन डेर लेन यांच्या या दौऱ्यामुळे या क्षेत्रांमध्ये आणखी सहकार्य वाढवण्याची शक्यता आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात असलेली धोरणात्मक भागीदारी जागतिक परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या भागीदारीमुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या आर्थिक, सुरक्षा आणि तंत्रज्ञान विकासासाठी संधी मिळतील.

उर्सुला वॉन डेर लेन यांच्या भारत दौऱ्यामुळे, भविष्यात भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंध आणखी दृढ होण्याची आशा आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वास आणि सहकार्याचे एक नवीन युग सुरू होईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter