भारताच्या धोरणांमध्ये ‘आसियान’ला महत्त्व - डॉ. एस. जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
डॉ. एस. जयशंकर
डॉ. एस. जयशंकर

 

भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणामध्ये आणि हिंद-प्रशांत क्षेत्राबाबतच्या धोरणामध्ये ‘आसियान’ गटाला अत्यंत महत्त्व असून या गटातील सदस्य देशांमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले.

लाओसची राजधानी व्हिएनटाइन येथे ‘असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट एशियन नेशन्स’ (आसियान) दहा देशांच्या संघटनेची परिषद सुरू झाली असून यामध्ये जयशंकर हे भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मागील वर्षी जाकार्ता येथे झालेल्या या गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

त्यावेळी मोदींनी जाहीर केलेल्या १२ मुद्द्यांच्या आराखड्यावर भारताने अंमलबजावणी सुरू केली असल्याचे जयशंकर यांनी आज परिषदेत सांगितले. जयशंकर म्हणाले,‘‘भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात आसियान गटाला प्रचंड महत्त्व आहे. या धोरणावर भारताने हिंद-प्रशांत धोरण आखले आहे. या गटातील देशांनी एकमेकांशी असलेले राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करणे आावश्‍यक आहे. सदस्य देशांमधील जनतेचाही एकमेकांशी संपर्क वाढणे गरजेचे आहे.’’ भारत आणि आसियान गटातील भागीदारीचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत आहे, असे सांगत जयशंकर यांनी समाधानही व्यक्त केले. भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या धोरणाद्वारे भारताने आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांबरोबर आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.

‘आसियान’ गटात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे.

विविध देशांबरोबर चर्चा
‘आसियान’च्या निमित्ताने जयशंकर यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. ब्रुनेई आणि न्यूझीलंड यांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा करताना जयशंकर यांनी सहकार्य वाढविण्याच्या मुद्द्यावर भर दिला. सिंगापूर, फिलिपिन्स, लाओस देशांच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली.

 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter