संसद भवनाच्या आवारात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रतापचंद्र सरंगी आणि मुकेश राजपूत यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात भाजपकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच आता भाजपकडून त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीसही देण्यात आली आहे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांच्याविरुद्ध हक्कभंगाची आणि सभागृहाचा अपमान केल्याची नोटीस बजावली आहे. लोकसभाध्यक्षांकडे ही नोटीस देताना निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना संसदेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे वक्तव्य विपर्यस्त स्वरूपात सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे.
धक्काबुक्कीच्या घटनेनंतर भाजपने गुरुवारी राहुल गांधींविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी या पोलिस तक्रारीवरून भाजपवर हताश झाल्याचा आरोप केला. ‘‘अदानी मुद्द्यावर चर्चा करायला सरकार घाबरते. डॉ. आंबेडकरांबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावना समोर आल्या आहेत. राहुल गांधी कोणालाही धक्का देऊ शकत नाही,’’ असा दावा त्यांनी केला आहे.
खासदारांची प्रकृती स्थिर
जखमी भाजप खासदार प्रतापचंद्र सरंगी आणि मुकेश राजपूत यांची प्रकृती स्थिर असल्याचे राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर दोन्ही खासदारांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दोघांचा रक्तदाब आता नियंत्रणात असून सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणीचे अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.