मुश्रीफांसह इद्रीस नायकवडी, जलाल्लुद्दिन सय्यद आणि वसिम बुऱ्हाण अजित पवारांचे स्टार कॅम्पेनर्स

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 30 d ago
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मुस्लिम स्टार प्रचारक
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मुस्लिम स्टार प्रचारक

 

महाराष्ट्रात लोकशाहीचा अर्थातच विधानसभा निवडणुकींचा उत्सव सुरू झाला आहे. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा देखील केल्या जात आहेत. भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अजित पवारांनी त्यांच्या १७ आमदारांना AB फॉर्मचे वाटप केले असल्याची सुत्रांची माहिती आहे. सध्या राज्यात बैठकांचा धडाका पहायला मिळत आहे. नुकतच अजित पवारांनी त्यांच्या स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे. यामध्ये चार मुस्लिम प्रतिनिधींना देखील संधी देण्यात आली आहे.      

... ‘ते’चार मुस्लिम स्टार प्रचारक 
निवडणूक म्हटल की उमेदवाऱ्या, भाषणे आणि प्रचार येतोच. प्रचाराच्या माध्यमातून सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी स्टार प्रचारक मोलाची भूमिका बजावतात. राष्ट्रवादीने काल एकूण २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. यामध्ये मुश्रीफांसह इद्रीस नायकवडी, जलाल्लुद्दिन सय्यद आणि वसिम बुऱ्हाण या मुस्लिम प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. 

        महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार,
कागल विधानसभेतून येणारे हसन मुश्रीफ पक्षाचे आणि अल्पसंख्यांक समाजाचे महत्वाचे नेते आहे. परंतु   धर्माच्या पलीकडे जाणारी हसन मुश्रीफ यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमा त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली आहे. कोणत्याही धर्माचे नेते न राहता त्यांनी सर्वसामावेशक अशी प्रतिमा तयार केली आहे.  राजकारण आणि समाजकारण करत असताना त्यांनी विविध पक्षातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. सध्या ते राज्य सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करत आहेत.   

तर वसिम बुऱ्हाण राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य म्हणून काम करत आहेत. स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्यानंतर वसीम यांनी फेसबुक पोस्ट करत पक्षाचे आभार मानले. पोस्ट करताना ते म्हणाले, “ स्टार प्रचारक पदी म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल आदरणीय दादा व आदरणीय तटकरे साहेब यांचे मनापासून आभार मानतो. स्टार प्रचारक म्हणून नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, संकल्प व ध्येय-धोरणे अगदी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहे. तसेच अजित पवारांच्या यशस्वी नेतृत्वात महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार आहे.” 

राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इद्रीस नायकवडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. इद्रीस नायकवडी यांच्या रूपाने विधानपरिषदेवर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अबाधित राहिले आहे.  सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून इद्रीस नायकवडी काम करत आहेत.

या निवडीविषयी बोलताना राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रदीप देशमुख म्हणतात,  “ जो व्यक्ति चांगला बोलू शकतो, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचवू शकतो अशा व्यक्तींना कोणताही राजकीय पक्ष स्टार प्रचारक निवडतो. यामध्ये जात धर्म असा संबंध येत नाही. मात्र एखाद्या समाजाला आकर्षित करण्यासाठी, त्या समाजातील मते मिळवण्यासाठी त्या त्या समाजातील व्यक्तीला पद देऊन  समीकरणांची मोट बांधली जाते.” 

पुढे ते म्हणतात,  “ लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाची मते मिळाली नाहीत. यामुळे अजित पवारांनी इद्रीस नायकवडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली. लागोलागच त्यांनी स्टार प्रचारकांच्या यादीत देखील मुस्लिम चेहऱ्यांचा समावेश केला आहे. यावरून ते मुस्लिम मते मिळवण्याचा आणि त्यांना पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते.”       

स्टार प्रचारक म्हणजे काय ?
निवडणूका लागल्या की विविध पक्षांकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत. पण हे स्टार प्रचारक के काम करतात. स्टार प्रचारक कोणाला म्हणतात असा प्रश्न आपल्याला पडतो. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष सेलिब्रिटी किंवा फेमस नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून निवडतात. या स्टार प्रचारकांवर मतदारांना आकर्षित करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याची विशेष जबाबदारी असते. स्टार प्रचारकांची भाषणे ऐकण्यासाठी, त्यांची रॅली पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. त्यांच्यामुळे  लोकांचे मतपरिवर्तन होण्याची शक्‍यता असते.

कोणकोण असणार अजित पवार गटाचे स्टार प्रचारक
अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, नितीन पाटील, मुश्ताक अंतुले, सयाजीराव शिंदे, ब्रिज मोहन श्रीवास्तव, अमोल मिटकरी, सय्यद जलालउद्दीन, धिरज शर्मा, रूपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, राजेंद्र जैन, सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, सुनील मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, अनिकेत तटकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वासिम बुन्हाण, प्रशांत कदम, संध्या सोनवणे, श्री. सिद्धार्थ कांबळे, सायली दळवी, बाळासाहेब कोळेकर, सलीम सारंग, चैतन्य (सनी) मानकर असे एकूण ३६ जण राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. 

मुस्लिम समाजाची मते निर्णायक 
मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरतात हे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पहिले आहे. विधानसभा निवडणुकीतही ही मते निर्णायक ठरतील असे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. 

मात्र स्टार प्रचारकांप्रमाणे प्रतिनिधित्वाबाबतही अजित पवार मुस्लिम समाजाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter