साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मोहंमद आझम यांचा सत्कार करताना संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. मोहंमद आझम यांचा विशेष सन्मान काल (दि. २१) अहमदनगर येथे करण्यात आला. सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर आयोजित सकाळ पुस्तक महोत्सवात संपन्न झाला. सकाळ माध्यम समूह, अहिल्यानगर महापालिका आणि आमदार संग्रामभैय्या सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवातील 'अभिजात मराठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा' या व्याख्यानसत्रात आझम यांनी भाषा शुध्दीकरणाच्या अवश्यकतेवर भर दिला.
यावेळी बोलताना मोहंमद आझम म्हणाले, "सध्याच्या काळात भाषांची खिचडी झाली आहे. त्यामुळे भाषा शुध्दीकरणाची मोहीम राबविणे आवश्यक आहे. शिक्षक या दिशेने प्रयत्न करतात, पण आपण सर्वांनीही भाषेच्या शुध्दतेसाठी पुढाकार घ्यायला हवा."
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आझम यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, "आझम सरांचे साहित्यिक योगदान खूप मोठे आहे. साहित्य अकादमीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
या कार्यक्रमात डॉ. मोरे यांनी अहिल्यानगरच्या निजामशाहीच्या विस्तीर्ण व्याप्तीवरही भाष्य केले. "अहिल्यानगर म्हणजे फक्त शहर नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा विचार करावा लागेल. या निजामशाहीत संत साहित्यिक निर्माण झाले," असे ते म्हणाले.
व्यासपीठावर मोहंमद आझम यांच्यासह कवी चंद्रकांत पालवे आणि भूषण देशमुख उपस्थित होते. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विलास गिते यांचाही सन्मान करण्यात आला, ज्यांचा सन्मान कवी चंद्रकांत पालवे यांनी स्वीकारला.
कार्यक्रमात हेमलता पाटील यांच्या 'परिधापल्याड' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले. प्रा. आझम यांच्या साहित्यिक कार्याचा सन्मान आणि भाषा शुध्दतेवरील त्यांचे विचार या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.