बहराईच संतप्त जमावाने जाळपोळ केल्याने दुकानांची झालेली हानी.
बहराईच (उत्तर प्रदेश) : दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजावरून निर्माण झालेल्या वादात एका युवकाचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मन्सूर गावातील महाराजगंज येथे घडली. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. काल आणि आजही हिंसाचार, जाळपोळीच्या घटना घडल्याने तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह ३० जणांना ताब्यात घेतले. दगडफेकीत बाराहून जखमी झाले आहेत. अफवांना चाप बसविण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे.
काल रात्री दूर्गा मूर्ती मिरवणुकीतील डिजेवरून वाद पेटला. रेहुआ मन्सूर गावचे रहिवासी रामगोपाल मिश्रा (वय २२) हा तरुण मिरवणुकीत सामील झाला होता. डीजेच्या आवाजावरून वादावादी सुरू असतानाच त्याचवेळी त्यांना गोळी लागली. त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच परिसरात हिंसाचार उसळला. बाढ़ता तणाव पाहता फखरपूर भाग आणि अन्य ठिकाणच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी प्रशासनाला धार्मिक संघटनांशी चर्चा करणे आणि वेळेत मूर्ती विसर्जन करण्याचे निर्देश दिले. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्याचेही आदेश दिले. याप्रकरणातील आरोपी सलमान याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या घरातून गोळी झाडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घरातच त्याचे दुकानही आहे.
कालच्या घटनेचे पडसाद आज सकाळी उमटले. प्रशासनाचा आणि पोलिसांचा निषेध करत ठिकठिकाणाहून मोर्चे निघाले. आज सकाळी पोलिसांनी ध्वजसंचलन करूनही नागरिकांनी रस्त्यावर उत्तरत रोष व्यक्त केला. अनेक ठिकाणी दुकानांची, वाहनांची, घराची जाळपोळ केली. यादरम्यान, गृहसचिव संजीव गुप्ता आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यादव यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलिस अधिक्षक वृंदा शुक्ला म्हणाल्या, कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी एसएचओ आणि महसी पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यास निलंबित केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पण कारवाई करूनही जनतेत तीव्र नाराजी आहे.
या वेळी सर्कल ऑफिसर रुपेंद्र गौड यांनी देखील बेजबाबदारपणा दाखविला असून त्यांनी लाठीमाराचे आदेश दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. कालच्या गोळीबारात मृत झालेले रामगोपाल मिश्रा याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकांनी नकार दिला. तसेच मृतदेह घेऊन ते तहसील कार्यालयाकडे गेले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हिंसाचारग्रस्त भागात आता तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. शहरातील आणि परिसरातील वातावरण नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला.
नेमके काय घडले ?
बहराईच येथील महसील तहसीलच्या महाराजगंज येथे काल दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूक महाराजगंज येथून जात असताना घाटापासून तीन किलोमीटर अलीकडे एका समुदायाने धार्मिक ठिकाणांसमोर मोठ्या आवाजात डीजे लावण्यास आक्षेप घेतला. त्यावर वाद पेटला. यावेळी इमारतीवरचा एक झेंडा काढण्याचा प्रयत्न होत असताना तणाव वाढला. त्याचवेळी एका घरातून गोळीबार झाला आणि दगडफेक सुरू झाली, या दगडफेकीत मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे आणखीच तणाव वाढला. यादरम्यान गोळी लागल्याने रामगोपाल मिश्रा यांचा मृत्यू झाला.
यानंतर जमाव भडकला आणि तोडफोड झाली, अनेक गाड्या तोडण्यात आल्या. वाढता तणाव पाहता या भागातील मूर्ती विसर्जन थांबविण्यात आले. जमावाने कारवाई होत नाही, तोपर्यंत विसर्जन न करण्याची धमकी दिली.
आरोपी अटकेत
बहराईच गोळीबारातील मुख्य आरोपी सलमान याच्यासह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पूजा समितीकडून रात्री उशिरापर्यंत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी रात्री उशिरापर्यंत रस्ते बंद
केले होते.
तीस जण ताब्यात
बहराईच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारने कारवाई करत तीस समाजकंटकांना ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकारी बहराईचमध्ये तळ ठोकून आहेत राखीव दलाच्या सहा तुकडया दाखल झाल्या असून तेथे पोलिस अधीक्षक दर्जाचे चार अधिकारी, दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सहा सर्कल ऑफीसर, एक आरएएफची तुकडी तैनात केली आहेत.
आज सकाळी महाराजगंज येथे काही भागात जाळपोळीचे प्रकार घडले. त्यामुळे महारागंज आणि महसी भागातील शाळांना सुटी देण्यात आली होती. कालच्या दगडफेकीत सुधाकर तिवारी, सत्यवान, अखिलेश वाजपेयी, विनोद मिश्रा, लाल विश्वकर्मा यांच्यासह बारा जण जखमी झाले आहे. बहुतांश जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काँग्रेस नेत्या, प्रियांका गांधी-वड़ा म्हणाल्या "उत्तर प्रदेशातील बहराईच येथील हिंसाबार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा दुःखद आणि क्लेषदायक आहे. मुख्यमंत्री आणि राज्याच्या प्रशासनाने तातडीने कारवाई करायला हवी. जनतेला विश्वासात घेऊन हिंसाचार थांबवावा. दोर्षीवर कडक कारवाई करावी. जनतेने कायदा हातात घेऊ नये."